Join us  

सातव्या दिवशी तेजीला ब्रेक; सेन्सेक्स, निफ्टीही घसरले

By admin | Published: October 09, 2015 3:38 AM

शेअर बाजारात गेल्या सहा सत्रांपासून सुरू असलेल्या तेजीला गुरुवारी ब्रेक लागला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १९0 अंकांनी घसरून २७ हजार अंकांच्या खाली बंद झाला.

मुंबई : शेअर बाजारात गेल्या सहा सत्रांपासून सुरू असलेल्या तेजीला गुरुवारी ब्रेक लागला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १९0 अंकांनी घसरून २७ हजार अंकांच्या खाली बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही खाली आला. गेल्या सहा सत्रांत सेन्सेक्सने तब्बल १,४१९.0१ अंकांची वाढ मिळविली होती. त्यामुळे बाजारात जरासे सावध वातावरण दिसून आले. आज बाजारात नफा वसुलीकडे कल होता. त्यामुळे जोरदार विक्री झाली. आशियाई बाजारांतही नरमाईचा कल दिसून आला. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात केलेली 0.५0 टक्क्यांची कपात आणि अमेरिकी फेडरल रिझर्व्हची लांबणीवर पडलेली व्याजदर वाढ याचा परिणाम म्हणून गेल्या सहा सत्रांत शेअर बाजारांत तेजी दिसून आली.बीएसई सेन्सेक्स सकाळी तेजीत होता. २७,१२0.११ अंकांपर्यंत तो वर चढला होता. त्यानंतर मात्र नफा वसुली सुरू झाल्याने घसरण सुरू झाली. एका क्षणी सेन्सेक्स २६,७६२.३६ अंकांपर्यंत खाली घसरला होता. सत्राच्या अखेरीस तो १९0.0४ अंकांनी अथवा 0.७0 टक्क्यांनी घसरून २६,८४५.८१ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील ३0 पैकी १९ कंपन्यांचे समभाग घसरले. रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभाग सर्वाधिक २.७0 टक्क्यांनी घसरला. त्याखालोखाल गेलचा समभाग २.५२ टक्के घसरला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४८.0५ अंकांनी अथवा 0.५९ टक्क्यांनी घसरून ८,१२९.३५ अंकांवर बंद झाला. त्या आधी तो अस्थिर असल्याचे चित्र दिसून आले. आशियाई बाजारांपैकी जपानचा निक्केई 0.९९ टक्क्यांनी घसरला. हाँगकाँग शेअर बाजाराचा निर्देशांक हँग सेंग 0.७१ टक्क्यांनी खाली आला. चीनचा शांघाय कंपोजिट मात्र २.९७ टक्क्यांनी वर चढला. युरोपीय बाजारांत सकाळी किंचित तेजी दिसून आली. (वृत्तसंस्था)