Join us

सेन्सेक्सने घेतले तेजीचे वळण

By admin | Published: May 25, 2016 3:49 AM

सलग चार सत्रांतील घसरणीनंतर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स मंगळवारी ७५ अंकांनी वधारला. अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढीची भीती असतानाही कंपन्यांची तिमाही कामगिरी

मुंबई : सलग चार सत्रांतील घसरणीनंतर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स मंगळवारी ७५ अंकांनी वधारला. अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढीची भीती असतानाही कंपन्यांची तिमाही कामगिरी उत्तम असल्याचे चित्र समोर आल्याने बाजाराला दिलासा मिळाला.३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळच्या सत्रात घसरणीला लागलेला होता. त्यानंतर खरेदीत झालेली वाढ तसेच युरोपीय बाजारांची तेजीसह झालेले ओपनिंग यामुळे बाजार वर चढला. सत्राच्या अखेरीस सेन्सेक्स २५,३0५.४७ अंकांवर बंद झाला. ७५.११ अंकांची अथवा 0.३0 टक्क्याची वाढ त्याने नोंदविली. त्याआधी सलग चार सत्रांत सेन्सेक्स ५४९ अंकांनी घसरला होता. टाटा पॉवर आणि नॅशनल फर्टिलायझर्सचे समभाग ३ टक्क्यांपर्यंत उसळले. ब्रेडमध्ये कॅन्सरप्रवण घटक असल्याच्या वृत्ताचा फटका बसून खाद्यपदार्थांच्या कंपन्यांचे समभाग जोरात आपटले. ब्रिटानिया इंडस्ट्रीजला ४.४५ टक्क्यांपर्यंतची घसरण सोसावी लागली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १७.८0 अंकांनी अथवा 0.२३ टक्क्याने वाढून ७,७४८.८५ अंकांवर बंद झाला. आशियाई बाजारांपैकी जपानचा निक्केई 0.९४ टक्क्याने वाढला. चीनचा शांघाय कंपोजिट 0.७७ टक्क्याने, तर हाँगकाँगचा हँग सेंग 0.११ टक्क्याने वाढला. युरोपीय बाजारांत सकाळी तेजी पाहावयास मिळाली. फ्रान्स आणि ब्रिटन येथील बाजार १.५ टक्क्यापर्यंत तेजी दर्शवीत होते.सेन्सेक्समधील ३0पैकी १७ कंपन्यांचे समभाग वाढले. एनटीपीसीचा समभाग सर्वाधिक २.0३ टक्क्यांनी वाढला. त्याखालोखाल टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी यांचे समभाग वाढले. व्यापक बाजारात मात्र घसरणीचा कल पाहावयास मिळाला. स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांक 0.६५ टक्का ते 0.१६ टक्का घसरले.