पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या मुलाखतीनंतर अमेरिकेतील प्रसिद्ध पॉडकास्ट लेक्स फ्रीडमन चर्चेत आलेत. त्यांनी पंतप्रधान मोदींशी अनेक विषयांवर चर्चा केली. पण या मुलाखतीची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे फ्रीडमन यांनी पीएम मोदींशी संवाद साधण्यापूर्वी ४५ तास उपवास केला.
तुमच्याशी बोलण्यासाठी मी ४५ तास म्हणजे जवळपास दोन दिवस उपवास केलाय, या दरम्यान फक्त मी पाणी प्यायलो आहे, असं आपल्या पॉडकास्टच्या सुरुवातीला त्यांनी पंतप्रधान मोदींना सांगितलं. पंतप्रधान मोदी यांच्या सन्मानार्थ आणि अध्यात्माशी संबंधित संवाद साधण्यासाठी त्यांनी हे केल्याचं म्हटलं.
कोण आहे लेक्स फ्रीडमॅन?
४१ वर्षीय रिसर्च सायंटिस्ट आणि पॉडकास्ट करणारे लेक्स फ्रीडमन अमेरिकेच्या ऑस्टिन शहरात राहतात. त्यांनी आपल्या पॉडकास्ट चॅनेल लेक्स फ्रिडमन पॉडकास्टच्या माध्यमातून जगातील अनेक मोठ्या व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत. २०१८ मध्ये त्यांनी हे चॅनेल सुरू केलं होतं. लेक्स फ्रीडमन यांचा जन्म १५ ऑगस्ट १९८३ रोजी ताजिकिस्तान, सोव्हिएत युनियन येथे झाला. यानंतर त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण मॉस्को येथे केलं.
त्यांचं शिक्षण किती?
सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर, ते १९९१ मध्ये ते आपल्या कुटुंबासह शिकागो येथे स्थायिक झाले, जिथे त्यांनी हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलं. त्यांनी कम्प्युटर सायन्समध्ये बीएससी आणि एमएससी तसंच इलेक्ट्रिकल आणि कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये पीएचडी मिळवली. फ्रीडमन यांनी गुगलमध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. परंतु त्यांनी केवळ ६ महिन्यांमध्येच नोकरी सोडली. यानंतर त्यांनी एमआयटीच्या एज लॅबमध्ये काम केलं.
किती आहे संपत्ती?
फ्रीडमॅन त्यांच्या यूट्यूब चॅनेलवरून भरपूर पैसे कमावतात. त्यांच्या युट्यूब चॅनेलचे ४० लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. द वीकनुसार, २०२४ मध्ये, त्यांची एकूण नेटवर्क सुमारे ८० लाख डॉलर्स होतं.
याचीही घेतलीये मुलाखत
लेक्स फ्रीडमन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क, युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेंस्की, अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस आणि मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग अशा अनेक बड्या व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत.