नवी दिल्ली - देशभरातील कुठल्याही महामार्गावर अथवा राज्य महामार्गावर टोल आकारणी केली जाते. मागील काळात सरकारने सर्व वाहनांसाठी फास्टटॅग बंधनकारक केले. मात्र आज म्हणजे १ ऑगस्टपासून फास्टटॅगच्या नियमांत काही बदल होत आहेत. त्यामुळे वाहनधारकांना त्यांच्या फास्ट टॅग अकाऊंटमध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे. ज्यामुळे टोल प्लाझावर कुठल्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही. जर या नियमांचे उल्लंघन केले तर तुमचं फास्टटॅग ब्लॅक लिस्टेड होऊ शकतं.
काय आहेत फास्टटॅगचे नवे नियम?
FastTag साठी सर्वात मोठा नियम म्हणजे, तुम्हाला तुमची Know Your Customer म्हणजेच KYC प्रक्रिया अपडेट करावी लागेल. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या नियमानुसार, ज्या फास्टटॅग अकाऊंटला ५ वर्ष अथवा त्याहून अधिक काळ झाला असेल तर त्यात बदल करणे गरजेचे आहे. त्यासाठी फास्टटॅग यूजरला त्यांच्या अकाऊंटच्या इन्शूरन्स डेट तपासावा लागेल. आवश्यकता भासल्यास ते बदलावेही लागेल.
ज्या फास्टटॅग अकाऊंटला ३ वर्ष झालेत, त्यांना पुन्हा एकदा KYC पूर्ण करावी लागेल. फास्टटॅग सेवेसाठी KYC करण्याची मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत आहे. मात्र १ सप्टेंबरपर्यंत तुम्ही तुमच्या फास्टटॅग अकाऊंटची केवायसी पूर्ण केली नाही तर तुम्हाला १ सप्टेंबरपासून ब्लॅक लिस्ट केले जाईल.
फास्टटॅगच्या नियमात आणखी एक बदल म्हणजे तुम्हाला फास्टटॅग अकाऊंट तुमच्या वाहन आणि वाहन मालकाच्या फोन नंबरशी लिंक करावे लागेल. एप्रिलपासून हे निर्देश जारी केले आहेत. एका फास्टटॅग अकाऊंटचा वापर केवळ एका वाहनासाठीच केला जाईल. त्याशिवाय फास्टटॅग अकाऊंटला वाहन रजिस्ट्रेशन नंबरशी लिंक करणे आवश्यक आहे. त्यासाठी वाहनाचा फ्रंट आणि साइड फोटोही पोर्टलवर अपलोड करावा लागेल. जे लोक १ ऑगस्ट किंवा त्यानंतर वाहन खरेदी करणार असतील तर त्यांना वाहन खरेदीच्या ३ महिन्याच्या आत त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर अपडेट करावा लागेल.