Join us

वडिलांना बनवायचं होतं IAS, मुलानं सुरू केलं चहाचं दुकान; आता वर्षाला १५० कोटींचा टर्नओव्हर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 2:31 PM

२२-२३ वर्षांच्या या दोन मित्रांनी १५० कोटींच्या टर्नओव्हर वाली एक कंपनी उभी केली.

चाय सुट्टा बार (Chai Sutta Bar) हे नाव ऐकून तुमच्या डोक्यात काही वेगळा विचार येण्यापूर्वी एक गोष्ट स्पष्ट करू की हा कोणताही बार नाही. ज्या ठिकाणी तुम्हाला मद्य मिळेल ना सिगरेट. हा केवळ एक चहाचं दुकान आहे. जसं याचं नाव मनोरंजक आहे तसाच याचा प्रवासही मनोरंजक आहे. ज्या वयात तरूण तरुणी खेळण्यात किंवा फिरण्यात आपला वेळ घालवतात, त्याच वयात दोन मित्रांनी मिळून एक कंपनीच उभी केली. २२-२३ वर्षांच्या या दोन मित्रांनी १५० कोटींच्या टर्नओव्हर वाली एक कंपनी उभी केली.

कशी झाली सुरूवात?

याची सुरूवात २०१६ मध्ये झाली. अनुभव दुबे आणि आनंद हे दोघेही बालपणीचे मित्र. दोघांनी बी.कॉमचं शिक्षण घेतलंय. दोघेही इंदूर येथील एकाच शहरातील रहिवासी आहेत. अनुभवचे वडील व्यापारी होते. पण, आपल्या मुलानं या व्यवसायात यावं असं त्यांना मूळीच नव्हतं. त्यामुळेच त्याला यूपीएससीच्या तयारीसाठी त्यांनी दिल्लीला पाठवण्याचा निर्णय घेतला. सीए परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यानंतर त्यानं यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. पण, आपल्याला नोकरी नाही, तर व्यवसायच करायचाय हे त्याच्या लक्षात आलं.

गर्ल्स हॉस्टेलसमोर पहिलं आऊटलेट

कसला व्यवसाय करावं याचा त्याचा त्यानं हळूहळू शोध घेण्यास सुरूवात केली. याच दरम्यान त्याची आनंद नायक याच्याशी ओळख झाली. दोघांकडेही अधिक पैसा नव्हता. त्यांनी दोघांनी मिळून ३ लाख रुपये उभे केले. यात कोणता व्यवसाय सुरू करावा असा ऑप्शन त्यांनी शोधण्यास सुरूवात केली. यानंतर त्यांनी चहाचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. दोघांनी गर्ल्स हॉस्टेलसमोर आपलं पहिलं आऊटलेट सुरू केलं. तिकडे मुलं येणं स्वाभाविक आहे असं त्यांना वाटलं आणि हळूहळू तेच त्यांचे ग्राहक बनले. नावामागेही कहाणी

आपण बोर्डही तयार करू शकू इतकेही पैसे आपल्याकडे नव्हते. यासाठीच त्यांनी एका लाकडी फळीवर स्पे नं नाव लिहिलं. नावं वाचून तरी लोकांनी एकदा या ठिकाणी यावं असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे मार्केटिंग अप्रोच त्यांनी सोबत ठेवला. चाय सुट्टा असं नाव जरी त्यांनी ठेवलं असलं तरी त्यांच्या आऊटलेटमध्ये स्मोकिंग बॅन आहे. लोकांच्या तोंडात नाव बसावं यासाठीच ते नाव ठेवण्यात आल्याचं अनुभव दुबेनं सांगितलं.

भन्नाट आयडिया

दुकानावर गर्दी दाखवण्यासाठी ते दोघं आपल्या मित्रांना दुकानावर बोलावत असत. तसंच दुसऱ्यांसमोर मोठ्यानं तुम्ही चाय सु्ट्टा बार मध्ये गेलात का अशीही चर्चा करत होते. अनुभवनं दुकानासमोर मित्रांना बोलावून गर्दी दाखवली, जेणेकरून अन्य लोकही त्या ठिकाणी यावेत. त्याची आयडिया कामी आली आणि ६ महिन्यांमध्ये त्यानं २ राज्यांत ४ फ्रेन्चायझी विकल्या.

१९५ शहरांत ४०० आऊटलेट

अनुभवनं आपल्या मित्रांसोबत मिळून देशातील १९५ शहरांत ४०० पेक्षा अधिक आऊटलेट सुरू केलेत. देशातच नाही तर दुबई, युके, कॅनडा आणि ओमान या ठिकाणीही हे आऊटलेट पोहोचलेत. आज त्यांची कंपनी वर्षाला १०० ते १५० कोटींचा चहा विकते. केवळ त्यांच्या आऊटलेटचा वर्षाचा टर्नओव्हर ३० कोटी आहे.

टॅग्स :व्यवसाय