नवी दिल्ली : शिलकी साठ्यात असलेल्या गव्हाच्या विक्रीतून भारतीय खाद्य महामंडळाला (एफ.सी.आय.) चालू वित्तीय वर्षाच्या अखेरीसपर्यंत १०,४०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची आशा आहे.एफसीआयने आपल्या स्टॉकमधून आतापर्यंत ४१ लाख टन गव्हाची विक्री केली आहे. आतापर्यंत १,६०५ रुपये प्रति क्विंटल दराने गव्हाची विक्री करण्यात आली आहे. चालू वित्तीय वर्षाच्या अखेरपर्यंत याच दराने किमान ६५ लाख टन गव्हाची विक्री होण्याचा अंदाज आहे.गेल्या वर्षी १,६०२ रुपये प्रति क्विंटल या दराने गव्हाची विक्री झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हा भाव थोडासाच जास्त आहे. १ जानेवारी रोजी एफसीआयजवळ आवश्यक असलेल्या बफर स्टॉकपेक्षा ७४ टक्के जास्त साठा होता. याच अर्थ २४० लाख टन अतिरिक्त गहू होता. नियमानुसार हा साठा १३८ लाख टन पाहिजे.या गव्हाच्या विक्रीने साठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले. गव्हाचा साठा भरपूर असून, साठा पुरेसा असल्याने दरावरही नियंत्रण राहील. गेल्या पाच वर्षांपासून बफर स्टॉकमध्ये असलेल्या गव्हापेक्षा साठा दुप्पट असल्याचे माजी अन्नमंत्री शांताकुमार यांच्या नेतृत्वाखालील एफसीआयच्या समितीने म्हटले आहे. साठा अतिरिक्त झाल्याने कोणताही फायदा होत नाही.
एफसीआयला गहू विक्रीतून मिळणार १०,४०० कोटी
By admin | Published: January 11, 2016 3:07 AM