नवी दिल्ली : आर्थिक वर्ष २०१६-२०१७च्या पहिल्या दोन महिन्यांत (एप्रिल व मे) भारताने ५.३४ अब्ज डॉलर्सची थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय) मिळविली. लोकसभेत ही माहिती शुक्रवारी देण्यात आली.दोन महिन्यांत देशात स्वयंचलित मार्गांनी ४.७६ अब्ज डॉलर्सची तर मान्यता दिलेल्या मार्गांनी ५८२ दशलक्ष डॉलर्सची थेट विदेशी गुंतवणूक झाली, असे अर्थ राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी लेखी उत्तरात सांगितले. मेघवाल म्हणाले, ‘‘भारत थेट विदेशी गुंतवणुकीसाठी आकर्षक देश असावा आणि गुंतवणूकदारांसाठी अनुकूल वातावरण असावे यासाठी भारताने अनेक क्षेत्रांत थेट गुंतवणुकीच्या धोरणात बदल केले आहेत.’’ संरक्षण, औषध निर्माण, हवाई वाहतूक, अन्न आणि प्रसारण आदी क्षेत्रात सरकारने थेट गुंतवणुकीचे धोरण शिथिल केले आहे. या दोन महिन्यांत संरक्षण क्षेत्राला काहीही थेट विदेशी गुंतवणूक झालेली नाही तर ४५२.८६ दशलक्ष डॉलर्सची थेट विदेशी गुंतवणूक औषध निर्माण क्षेत्रात झाली आहे.
भारतात ५.३४ अब्ज डॉलर्सची एफडीआय
By admin | Published: July 25, 2016 4:20 AM