लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : बातम्यांची निर्मिती आणि दिशाभूल करणारी माहिती यांसाठी कृत्रिम बद्धिमत्तेचा (एआय) वापर होत असल्याबद्दल एका सर्वेक्षणात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अशा बातम्या केवळ गुगलच्या डाटावर आधारित असतात, त्यातून खोटी माहिती प्रसारित होण्याचा धोका आहे, असे या सर्वेक्षणात म्हटले आहे.
‘रॉयटर्स इन्स्टिट्यूट फॉर द स्टडी ऑफ जर्नालिझम’द्वारा हे सर्वेक्षण प्रकाशित करण्यात आले आहे. ४७ देशांतील सुमारे एक लाख लोकांनी या सर्वेक्षणात भाग घेतला.
अहवालात म्हटले आहे की, बातम्यांच्या निर्मितीसाठी ‘एआय’चा वापर करणे धोकादायक आहे. विशेषत: राजकारणासारख्या संवेदनशील विषयांवर ‘एआय’ विश्वसनीय ठरू शकत नाही. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या प्रत्येक देशातील दोन हजार नागरिकांनी सर्वेक्षणातील विविध प्रश्नांना उत्तरे दिली. अमेरिकेतील ५२ टक्के, तर ब्रिटनमधील ६३ टक्के उत्तरदात्यांनी म्हटले की, एआयद्वारे निर्मित बातम्या घातक असण्याचा धोका आहे.
सर्वेक्षण अहवालाचे प्रमुख लेखक निक न्यूमॅन यांनी सांगितले की, ‘एआय’च्या वापरावर लोकांनी अविश्वास दाखविणे आश्चर्यकारक आहे. ‘एआय’मुळे बातम्यांच्या विश्वसनीयतेचे भवितव्य धोक्यात येऊ शकते, अशी भीती लोकांनी सर्वेक्षणात व्यक्त केली.
चिंता ३ टक्के वाढली - ऑनलाइन खोट्या बातम्यांच्या बाबतीतील चिंता यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत ३ टक्के वाढल्याचे दिसून आले. सर्वेक्षणातील ५९ टक्के उत्तरदात्यांनी म्हटले की, आपल्याला याबाबत चिंता वाटते.
- दक्षिण आफ्रिका आणि अमेरिकेत हा आकडा अनुक्रमे ८१ टक्के आणि ७२ टक्के होता. दोन्ही देशांत यंदा निवडणुका होत आहेत.