Join us

ऑफर्स, डिस्काउंटच्या नादात भीती अधिक खर्चाची! कसे टाळणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 11:05 AM

नको असलेली खरेदी कशी टाळावी, याच्या काही टिप्स आज जाणून घेऊ.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : सणासुदीच्या हंगामात ऑफलाईन आणि ऑनलाईन विक्रेत्यांकडून ऑफर आणि डिस्काउंटचा भडिमार केला जात आहे. त्याच्या मोहातून ग्राहक जास्तीची खरेदी करण्याचा धोका असतो. मित्रमैत्रिणींकडून मिळालेल्या माहितीची खात्री न करता काही जण बिनधास्त खरेदीला जातात. काही गोष्टींची काळजी घेतली, तर अतिरिक्त खरेदी टाळता येऊ शकते. नको असलेली खरेदी कशी टाळावी, याच्या काही टिप्स आज जाणून घेऊ. आपले बजेट निश्चित करा : 

खर्च कमी करण्याचा सर्वांत प्रभावी उपाय म्हणजे आपले खरेदीचे बजेट निश्चित करणे. याद्वारे तुम्ही आपला घरचा किराणा आणि शिध्यासह अन्य वित्तीय जबाबदाऱ्या पूर्ण करू शकता.

क्रेडिट कार्डद्वारे खरेदी टाळा: तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल, तर तुम्हाला अधिक सावध राहण्याची गरज आहे. कार्डांवर जबरदस्त ऑफर्स देण्यात येत असल्या तरी त्याद्वारे जास्तीची खरेदी होण्याचा धोका सर्वाधिक असतो. कारण सर्व खरेदी उधारीवर असते. नंतर हे पैसे बँका अव्वाच्या सव्वा व्याज लावून वसूल करीत असतात.

खर्चाची यादी तयार करा: आपल्याला काय खरेदी करायची आहे, याची एक यादी आधीपासून तयार करून ठेवा. त्यातून आपले एकूण उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ बसविता येतो. खर्च बजेटच्या बाहेर जात असल्यास यादीमुळे लगेच कळते आणि त्यात कपात करता येते.

घाईगर्दीत कोणतीही खरेदी करण्याचे टाळा. सर्वाधिक चांगली सवलत अथवा सूट कोठे मिळत आहे, याचा शोध घ्या. त्यानंतरच खरेदी करा. त्यासाठी तुम्हाला थोडी अधिकची पायपीट होईल, एवढेच.

 

टॅग्स :खरेदी