Join us

निकालाची धाकधूक, शेअर्स विकावे की थांबावे? बाजार अस्थिर राहण्याची शक्यता 

By प्रसाद गो.जोशी | Published: May 13, 2024 9:14 AM

महागाईच्या आकडेवारीकडे लक्ष

प्रसाद गो. जोशी, देशातील वाढती चलनवाढ आणि लोकसभा निवडणुकांचे जवळ येणारे निकाल या पार्श्वभूमीवर बाजार अस्थिर राहण्याची शक्यता असून महागाईच्या आकडेवारीनंतर बाजार खाली गेल्यास कमी किमतीमध्ये खरेदी करण्याची संधी मिळू शकते. मात्र त्यासाठी गरज आहे ती अचूक वेळ साधण्याची. 

येत्या सप्ताहामध्ये भारतासह अमेरिका, चीन आणि जपानमधील चलनवाढीची आकडेवारी जाहीर होईल. तेलाच्या किमती व परकीय संस्थांची भूमिका, कंपन्यांचे निकाल हे घटक बाजाराला दिशा देतील. फेडरल रिझर्व्हचे प्रमुख काय बोलतात याकडे बाजाराचे लक्ष असणार आहे.

अस्थिरतेमुळे काही चांगले शेअर्स कमी किंमतीत मिळण्याची संधी आहे. परकीय व देशी वित्तसंस्थांनी विक्रीवर जोर दिल्याने बाजार खाली आला. हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांना सावध राहावे लागेल. 

संस्थांनी काढून घेतले १७ हजार कोटी

लोकसभा निवडणुकीच्या निकालांबाबतची अनपेक्षितता लक्षात घेऊन परकीय वित्तसंस्थांनी नफा कमविण्यासाठी मे महिन्यात विक्रीला प्राधान्य दिले आहे. पहिल्या १० दिवसांमध्ये संस्थांनी शेअरमधून १७,०८३ कोटी तर रोख्यांमधून १६०२ कोटी काढले. तेजीचा फायदा घेतानाच निवडणूक निकालांबाबतची सावधगिरी यामधून दिसते. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांमध्ये परकीय वित्तसंस्थांनी भारतीय बाजारात गुंतवणूक केलेली दिसून आली. देशांतर्गत वित्तसंस्थांनीही ५२, १५२ कोटी रुपयांचे शेअर्स या महिन्यामध्ये विकले आहेत.

गुंतवणूकदारांचे भांडवल ९.६७ लाख कोटींनी घटले 

गतसप्ताहात शेअर बाजार खाली आल्यामुळे गुंतवणूकदारांचे भांडवल कमी झाले आहे. सप्ताहाच्या अखेरीस बाजारामध्ये नोंदणीकृत कंपन्यांचे भागभांडवल ३,९६,५६,४४०.६८ कोटी रुपयांवर आले आहे. आधीच्या सप्ताहामध्ये हे भांडवल ४,०६,२४,२२४.४९ कोटी रुपये होते. याचाच अर्थ गुंतवणूकदार ९, ६७,७८३.६६ कोटींनी गरीब झाले. ही घट ही केवळ कागदोपत्री असून त्याचा थेट लाभ अथवा फटका बसत नाही.

बाजाराची स्थिती 

निर्देशांक    बंद मूल्य    बदलसेन्सेक्स    ७२,६६४.४७    -१२१३.६८निफ्टी    २२,०५५.२०    -४२०.६५ मिडकॅप    ४१,०२७.७५    -१३८६.७८स्मॉलकॅप    ४५,३९६.९९    -१७९४.४२ 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजार