Foxconn Unit in UP: अॅपलची जगातील सर्वात मोठी वेंडर फॉक्सकॉन उत्तर प्रदेशात आपला पहिला कारखाना उभारण्याच्या विचारात आहे. ग्रेटर नोएडातील यमुना एक्स्प्रेस वेजवळ ३०० एकर जागेवर हा कारखाना उभारण्यात येणार आहे. इकॉनॉमिक टाइम्सनं सूत्रांच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. फॉक्सकॉन पहिल्यांदाच यूपीमध्ये स्वत:चं युनिट उभारण्याच्या तयारीत आहे.
फॉक्सकॉननं बंगळुरूमध्ये उभारलेल्या कारखान्यापेक्षा हा कारखाना थोडा मोठा असू शकतो, असं सूत्रांनी सांगितलं. बंगळुरू कारखाना हा कंपनीचा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा कारखाना असेल. ग्रेटर नोएडातील कारखान्यात काय बनवलं जाईल हे अद्याप ठरलेलं नाही. यासंदर्भात सरकारशी चर्चा सुरू आहे. फॉक्सकॉन केवळ अॅपलसाठीच नाही तर मायक्रोसॉफ्ट आणि सोनीसाठीही काम करते. ही कंपनी स्मार्टफोनपासून ते टॅब्लेट, टीव्ही आदी इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची निर्मिती करते. अॅपल फॉक्सकॉनमध्ये आयफोनसह आपली अनेक उत्पादनं बनवते.
कुठे घेतली जमीन?
फॉक्सकॉन त्याच जागेवर कारखाना उभारू शकते, ज्या भागात एचसीएल-फॉक्सकॉननं OSAT (आउटसोर्स सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट) सुविधेसाठी ५० एकर जमीन घेतली आहे. ओसॅट म्हणजे सेमीकंडक्टर चिप्स जोडणं आणि त्याचं टेस्टींग करणं. या प्रकल्पाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. आणखी एका सूत्रानं दिलेल्या माहितीनुसार, भारत सरकारनं गेल्या वर्षी फॉक्सकॉन इंडस्ट्रियल पार्क प्रकल्पासाठी ३०० एकर जागा प्रस्तावित केली होती. या वाटाघाटी अद्याप प्राथमिक अवस्थेत आहेत. कोणती उत्पादनं बनवली जातील आणि कोणते ग्राहक असतील हे अद्याप ठरलेले नाही.
ही जमीन यमुना एक्स्प्रेस वेच्या काठावर आहे. यमुना एक्सप्रेस वे आग्रा आणि ग्रेटर नोएडाला जोडतो. यमुना एक्स्प्रेस वे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अॅथॉरिटी (YEIDA) या जागेच्या कामाचं व्यवस्थापन करते. यमुना एक्सप्रेस वे जेवर येथील आगामी विमानतळ आणि नोएडा-ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस वेला जोडतो.