- सचिन लुंगसे
मुंबई : कोरोनाचा फटका उद्योगधंद्यांनाही बसू लागला असून, ‘सोन्या’सारखा सराफा बाजार कोरोनामुळे तोट्यात आहे. मुंबईतील दररोजचा सराफा बाजारातील खरेदी-विक्रीचा व्यवहार ४० ते ५० टक्क्यांनी घटला आहे. राज्याचा विचार करता, महाराष्ट्रातील सराफा बाजाराला दररोज १० टक्क्यांचा तोटा होत आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील सराफा बाजाराचे तब्बल ४०० कोटी रुपये नुकसान होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. बाजाराच्या चिंता दिवसागणिक वाढत असून, शनिवारीपासून सराफा बाजारही ‘शट डाउन’ होणार आहे.
बहुतांश शहरांत ‘लॉक डाउन’ सुरू झाले असून, कोणताच घटक कोरोनापासून सुटलेला नाही. महाराष्ट्रासह मुंबईतल्या सराफा बाजाराला कोरोनाचा फटका बसला आहे. या संदर्भात अधिक माहिती देताना मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष कुमार जैन यांनी सांगितले की, कोरोनामुळे सराफा बाजाराचे मोठे नुकसान होत आहे. महाराष्ट्रात गुढीपाडवा मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून गुढीपाडव्याला मान आहे. मात्र, याच मुहूर्तावर सराफा बाजाराचे तब्बल ४०० कोटींचे नुकसान होणार आहे. यावर उपाय म्हणून आम्ही सराफा बाजार आॅनलाइन घेऊन जाण्याचा विचार करत आहोत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ज्यांना सोनेखरेदी करायची आहे, अशा ग्राहकांना या निमित्ताने सोन्याची खरेदी आॅनलाइन करता येईल. शिवाय पैसेही आॅनलाइन जमा करता येतील. खरेदी करण्यात आलेले सोने संबंधित ग्राहकांपर्यंत डिलिव्हरी बॉयमार्फत किंवा योग्य यंत्रणेमार्फत पोहोचविण्याबाबत विचार सुरू आहे.
मुंबईतील लागू बंधू ज्वेलर्सचे दिलीप लागू यांनी सांगितले की, कोरोनामुळे मुंबईतील सराफा बाजार बंद आहे. राज्य सरकारनेच बाजार बंद ठेवण्यास सांगितले आहे. ३१ मार्चपर्यंत सराफा बाजार बंद राहील. याचा सराफा बाजाराला मोठा आर्थिक फटका बसणारआहे. व्ही. एम. मुसलुनकर ज्वेलर्सचे सुहास मुसलुनकर म्हणाले, कोरोनामुळे सोन्याची खरेदी-विक्री बंद झाली आहे. ग्राहक सराफा बाजारपेठेकडे फिरकेनासे झाले आहेत़ व्यवहार ठप्प आहेत. मुंबईतला सराफा बाजार दिवसाला ४० ते ५० टक्क्यांनी खाली आला आहे.
राज्यात १० टक्क्यांचा तोटा
मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष कुमार जैन यांनी सांगितले की, कोरोनामुळे सोन्याची खरेदी-विक्री थंडावली आहे. राज्याचा विचार करता महाराष्ट्रात दररोज सराफा बाजाराला १० टक्क्यांचा तोटा होत आहे.
सराफा बाजाराचे गुढीपाडव्याला ४०० कोटींचे नुकसान होण्याची भीती
बहुतांश शहरांत ‘लॉक डाउन’ सुरू झाले असून, कोणताच घटक कोरोनापासून सुटलेला नाही. महाराष्ट्रासह मुंबईतल्या सराफा बाजाराला कोरोनाचा फटका बसला आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 07:15 AM2020-03-21T07:15:13+5:302020-03-21T07:15:39+5:30