Join us

वाढत्या कर्जांमुळे जगावर आर्थिक संकटांची भीती; RBI गव्हर्नर यांचा सावधगिरीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 7:09 AM

मोठी कर्जे व उच्च व्याजदर यामुळे सरकारी, खासगी क्षेत्राचेही अर्थकारण बिघडून पुढे मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागू शकते.

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना जगात वाढत असलेल्या कर्जाबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. २०२४ मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेचा जीडीपी ३३३ टक्के असताना कर्जही ३१५ ट्रिलियन डॉलर्सच्या घरात पोहचले आहे, असे सांगत दास यांनी शुक्रवारी सिंगापूरमध्ये ‘फ्यूचर ऑफ फायनान्स फोरम २०२४’ मध्ये जगाला सावध केले आहे.

यावेळी दास म्हणाले की, कर्जाच्या अभूतपूर्व विस्तारामुळे उदयोन्मुख अर्थव्यवस्था आणि मध्यम तसेच कमी उत्पन्न असलेल्या देशांसाठी मोठा धोका उत्पन्न झाला आहे. या देशांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस कमकुवत होत आहे. मोठी कर्जे व उच्च व्याजदर यामुळे सरकारी, खासगी क्षेत्राचेही अर्थकारण बिघडून पुढे मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागू शकते. 

निवडणुकांमुळे मर्यादित संधी 

दास म्हणाले की, वित्तीय तूट सातत्याने वाढत असल्याने स्थिती आणखी जटील होत चालली आहे. ही आकडेवारी कोरोना महामारीच्या आधीच्या कालखंडापेक्षाही अधिक आहे. २०२४ मध्ये जगातील तब्बल ८८ अर्थव्यवस्थांमध्ये सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरु होत आहे.त्यामुळे वित्तीय एकत्रिकरणासाठी मिळणाऱ्या संधी मर्यादित राहणार आहेत. अशा स्थितीत वित्तीय तुटीमुळे निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देताना देशांना विविध उपाययोजना करून कर्जाचे प्रभावीपणे व्यवस्थापन करता आले पाहिजे.

विकास बँका मजबूत व्हाव्यात

जागतिक अर्थव्यवस्थेपुढील आव्हानांना तोंड देण्यासाठी देशांना सामूहिक प्रयत्न करावे लागतील. यासाठी बहुपक्षीय विकास बँकांना आणखी मजबूत करावे लागणार आहे. आर्थिक विकास व्हावा आणि स्थैर्य कायम राहावे यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन शक्तिकांत दास यांनी केले.

सध्याचे भूराजकीय तणाव व पुरवठा साखळीत आलेले व्यत्यय यामुळे गुंतवणूकदारांचा भर जोखीम टाळण्याकडे आहे. जागतिक व्यापाराला यामुळे फटका बसत आहे. -शक्तिकांत दास, गव्हर्नर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँक