Lokmat Money > बिझनेस न्यूज > फेडरल रिझर्व्ह, महागाईने दिला बाजाराला हात

फेडरल रिझर्व्ह, महागाईने दिला बाजाराला हात

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात तूर्त बदल न करण्याचा निर्णय घेतल्याने जगभरातील शेअर बाजारांमध्ये तेजी दिसून आली.

By admin | Published: September 20, 2015 11:06 PM2015-09-20T23:06:10+5:302015-09-20T23:06:10+5:30

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात तूर्त बदल न करण्याचा निर्णय घेतल्याने जगभरातील शेअर बाजारांमध्ये तेजी दिसून आली.

Federal Reserve, hands on the market by inflation | फेडरल रिझर्व्ह, महागाईने दिला बाजाराला हात

फेडरल रिझर्व्ह, महागाईने दिला बाजाराला हात

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात तूर्त बदल न करण्याचा निर्णय घेतल्याने जगभरातील शेअर बाजारांमध्ये तेजी दिसून आली. या जोडीलाच डॉलरच्या तुलनेत मजबूत होत असलेला रुपया, महागाईच्या दरामध्ये होत असलेली घट, वाढलेले औद्योगिक उत्पादन यामुळे बाजार चढा राहिला. कमी झालेली परकीय चलनाची गंगाजळी आणि घटत असलेली निर्यात या चिंतेच्या बाबी राहिल्या.
मुंबई शेअर बाजारात गतसप्ताह संमिश्र राहिला असला तरी घटीच्या तुलनेत वाढ जास्त झाल्याने बाजार वाढीव पातळीवर बंद झाला. संवेदनशील निर्देशांकाने २६ हजारांची ओलांडलेली पातळी हे बाजारासाठी शुभलक्षण मानले जाते. सप्ताहामध्ये संवेदनशील निर्देशांकामध्ये ६०८.७० अंशांची वाढ होऊन तो २६२१८.९१ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) १९२.६० अंशांनी वाढून सप्ताहाच्या अखेरीस ७९८१.९० अंशांवर पोहोचला. मिड कॅप आणि स्मॉल कॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही वाढ झालेली दिसून आली. बँकिंग निर्देशांकामध्ये सुमारे पाच टक्के अशी सर्वाधिक वाढ नोंदली गेली.
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने एवढ्यात व्याजदरांमध्ये वाढ न करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर बाजारातील अस्थिरता काही प्रमाणात कमी झाली. गेला महिनाभर वाट बघत असलेल्या परकीय वित्त संस्था आता पुन्हा आपली गुंतवणूक भारतासह अन्य देशांकडे वळविण्याची शक्यता आहे.
चांगल्या आंतरराष्ट्रीय वातावरणाबरोबरच देशांतर्गत पातळीवरही चांगली कामगिरी नोंदविली गेली आहे. देशाच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकामध्ये जुलै महिन्यामध्ये ४.२ टक्के वाढ नोंदविली गेली. त्याच्याच जोडीला शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यामध्ये १.२ टक्का वाढ झाली. ही गेल्या दोन वर्षांमधील सर्वाधिक वाढ आहे. आॅगस्ट महिन्यातील चलनवाढही कमीच झाली आहे. ग्राहक मूल्य निर्देशांकावर आधारित चलनवाढ ३.६६ टक्क्यांवर पोहोचली आहे, तर घाऊक मूल्य निर्देशांकावर आधारित चलनवाढ सलग १० व्या महिन्यात कमी होऊन -४.९५ टक्के झाली आहे.
या सर्व बाबींचा परिणाम हा भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदर कमी करण्यासाठी दबाव वाढविण्यात होत आहे. पुढील सप्ताहात बँक पतधोरणाचा आढावा घेणार आहे. त्यावेळी याबाबतचा निर्णय होऊ शकतो.
आॅगस्ट महिन्यात भारताची निर्यात मागील वर्षाच्या तुलनेत २०.६६ टक्क्यांनी कमी झाली आहे. त्याचप्रमाणे देशाची परकीय चलन गंगाजळीही घटत आहे. या चिंतेच्या बाबींवर तातडीने उपाययोजना होणे गरजेचे आहे.

Web Title: Federal Reserve, hands on the market by inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.