Join us  

"ज्या दिवशी मन रमणार नाही, त्यादिवशी कंपनीतून निघून जायचं...", TCS सोडल्यानंतर राजेश गोपीनाथन रोखठोक अंदाज!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 7:42 PM

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टीन्सी सर्विसेसचे (TCS) एमडी आणि सीईओ राजेश गोपीनाथन यांनी राजीनामा दिला आहे.

नवी दिल्ली-

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टीन्सी सर्विसेसचे (TCS) एमडी आणि सीईओ राजेश गोपीनाथन यांनी राजीनामा दिला आहे. टीसीएसमध्ये त्यांचा अद्याप चार वर्षांचा कालावधी बाकी होता. पण त्याआधीच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत कंपनीला अलविदा केलं आहे. आपल्या निर्णयाबाबत बोलताना त्यांनी केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. ज्या दिवशी मन रमणं बंद होईल त्यादिवशी निघून जायचं, असं गोपीनाथन यांनी टीसीएस सोडताना म्हटलं आहे. गेल्या सहा वर्षांपासून ते टीसीएसच्या सीईओ आणि एमडी पदाचा कार्यभार सांभाळत होते. 

गोपीनाथन हे तसं प्रसिद्धीपासून दूर राहणं पसंत करतात. शुक्रवारी सकाळी पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, ज्या दिवशी तुमच्या मनाला वाटू लागतं की आता थांबायला हवं तेव्हा तुम्हाला बाहेर पडायलाच हवं. स्वत:च्या भविष्याचा विचार करण्याची ही खूर्ची नाही, ही खर्ची कंपनीच्या भविष्याचा विचार करणारी आहे. ज्यादिवशी स्वत:च्या भविष्याच्या विचार करण्याची प्रक्रिया सुरू होते तेव्हा मला वाटतं की हीच योग्य वेळ आहे की मी पदावरुन बाजूला व्हावं आणि दुसऱ्याला ही जबाबदारी घेऊ द्यावी, असंही ते म्हणाले. 

टीसीएससोबत २२ वर्ष केलं कामटीसीएसमध्ये गोपीनाथन यांनी २२ वर्ष काम केलं. इतक्या मोठ्या कालवधीनंतर ते आयटी कंपनीपासून वेगळं होत आहेत. २२ वर्षांपैकी गेली सहा वर्ष कंपनीची कमान त्यांच्या हातात होती. त्यांच्या पदाचा कार्यकाळ २१ फेब्रुवारी २०२७ पर्यंत होता. १० वर्षांपूर्वी त्यांना कंपनीच्या सीएफओच्या जबाबदारीमुळे पहिला सी-सूट मिळाला होता. आपण कंपनीसाठी केलेल्या कामाचा प्रत्येक मिनिटाचा आनंद घेतला असंही ते म्हणाले. 

२००१ मध्ये टीसीएसमध्ये सुरू केला प्रवास"मला आज किती आनंदी आणि मोकळं वाटतंय हे मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. मला नाही माहित मी पुढे काय करणार आहे. पण मी अगदी वेगळ्याच जागी आहे आणि मी खूप खूश आहे", असं गोपीनाथन म्हणाले. त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय एक आठवड्यापूर्वीच घेतला होता. 

गोपीनाथन यांनी २००१ साली टीसीएसमध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी अमेरिकेत टीसीएसच्या नव्यानं स्थापन झालेल्या ई-बिझनेस युनिटचं नेतृत्व केलं होतं. बिझनेस फायनान्सचे उपाध्यक्ष राहिले. २०१७ साली एमडी आणि सीईओपदी प्रमोशन होण्याआधी ते २०१३ साली कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी होते. 

टॅग्स :टाटा