नवी दिल्ली : मान्सून विस्कळीत झाल्यामुळे देशाच्या अनेक भागांत अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे एप्रिल ते जुलै या तिमाहीत रासायनिक खतांची विक्री आदल्या वर्षाच्या तुलनेत १२.४ टक्क्यांनी घसरली आहे.प्राप्त माहितीनुसार, युरियाची विक्री १२.८ टक्क्यांनी, डाय-अमोनियम फॉस्फेट म्हणजेच डीएपीची विक्री २७.५ टक्क्क्यांनी, म्युरेट ऑफ पोटॅशची विक्री ८.८ टक्क्यांनी, तर मिश्र खतांची विक्री ६.५ टक्क्यांनी घसरली आहे. केवळ सिंगल सुपर फॉस्फेटच्या विक्रीत वार्षिक आधारावर ४.६ टक्क्यांची वाढ झाली आहे.खतांच्या विक्रीतील घसरण कृषी मंत्रालयाच्या पेरणीच्या आकडेवारीतील घसरणीशी जुळणारीच आहे. कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, ३० जूनपर्यंत खरिपाच्या पेरण्यांत गेल्या वर्षीच्या या काळाच्या तुलनेत ४.७ टक्क्यांची घसरण झालेली आहे. भाताखालील क्षेत्र ४ टक्क्यांनी, तर डाळींखालील क्षेत्र ३ टक्क्यांनी कमी झाले आहे. अन्नधान्यांखालील क्षेत्र ५.७ टक्क्यांनी, तेलबियांखालील क्षेत्र ५.५ टक्क्यांनी, तर कपाशीखालील क्षेत्र ८.७ टक्क्यांनी घसरले आहे.फर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडियाचे महासंचालक सतीश चंदर यांनी सांगितले की, गेल्या वर्षी लॉकडाऊनला घाबरून शेतकऱ्यांनी आधीच खते खरेदी करून ठेवली होती. त्यामुळे यंदांच्या आकडेवारीची तुलना गेल्या वर्षीच्या आकडेवारीशी करणे योग्य ठरणार नाही.दरवर्षी सरकार साधारणत: किती प्रमाणात खते लागतील याचा अंदाज घेऊन त्यानूसार साठा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत असते. मात्र बेभरवशाच्या पावसामुळे कधीतरी फटका बसून खतांच्या विक्रीवर त्याचा परिणाम होत असतो. यावेळीही तसाच काहीसा प्रकार घडला आहे.
जुलैमध्ये कमी झाले पावसाचे प्रमाणसूत्रांनी सांगितले की, खतांची विक्री आणि पेरण्या यातील घसरणीस मान्सूनची अनियमितता कारणीभूत आहे. जूनमध्ये दीर्घकालीन सरासरीपेक्षा ९.६ टक्के अधिक पाऊस झाला असला तरी जुलैमध्ये तो सरासरीपेक्षा ६.७ टक्क्यांनी कमी आहे. २० ते ११ जुलै यादरम्यान मोठा कोरडा कालावधी राहिला. नेमका हाच खरिपाच्या पेरण्यांचा काळ आहे. १२ जुलैनंतर पाऊस झाला. मात्र, या महिन्याची एकूण खत विक्री आदल्या वर्षाच्या तुलनेत १६.६ टक्क्यांनी कमी राहिली.