ऑनलाइन लोकमत
जुनागढ (गुजरात), दि. ८ - गुजरातमधल्या स्टेट बँकेच्या शाखेत काम करणा-या तरुणाचा व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यासाठी मागितलेल्या कर्जाचा अर्ज बँकेने केराच्या टोपलीत टाकला आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार २५ वर्षांच्या दिग्विजय सिंगने व्हॅलेन्टाइन डेसाठी आगाऊ पैसे मागितले होते. त्याची मागणी नाकारताना बँकेच्या अधिका-यांनी व्हॅलेन्टाइन डे हा अधिकृत सण नसल्यामुळे फेस्टिवल लोन देता येणार नाही असे सांगितले.
मी प्रसिद्धीसाठी कर्ज मागितलं नव्हतं अशी प्रतिक्रिया यावर दिग्विजयने यावर दिली आहे. तो जुनागड जिल्ह्यातील चुडा येथल्या शाखेत नोकरीला आहे. याआधी त्याने वसंत पंचमीला अशाच कर्जाची मागणी केली होती, जी मंजूर झाली होती. बँक अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार सणा साजरे करण्यासाठी स्टेट बँक कर्मचा-यांना एका पगाराएवढे कर्ज बिनव्याजी देते, जे सदर कर्मचारी १० हप्त्यांमध्ये फेडू शकतो. परंतु, व्हॅलेन्टाइन डे हा सणांच्या यादीत मोडत नसल्यामुळे दिग्विजयला हे बिनव्याजी कर्ज मिळू शकले नाही.