Join us

आयटीआर आठ दिवसात दाखल करा, नाहीतर भरावा लागेल ५ हजारांचा दंड; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 10:14 AM

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आता फक्त आठ दिवस बाकी आहेत. तुम्ही ३१ जुलैपर्यंत आयटीआर दाखल न केल्यास तुम्हाला दंड म्हणून मोठी रक्कम भरावी लागू शकते.

आयटीआर रिटर्न करणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही आयटीआर रिटर्न वेळेत केले नाहीतर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै आहे आणि हे काम करण्यासाठी तुमच्याकडे फक्त ८ दिवस उरले आहेत. जर तुम्ही अजुनही आयटीआर भरला नसेल, तर लगेच भरा. कारण आयकर विभाग यावेळी मुदत वाढवणार नाही. ३१ जुलैनंतर आयटीआर दाखल करणाऱ्यांना दंड म्हणून मोठी रक्कम खर्च करावी लागू शकते. 

३ कोटींहून अधिक रिटर्न फाइल

इन्कम टॅक्स फाइलिंग पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १२ कोटींहून अधिक करदात्यांनी पोर्टलवर आपली नोंदणी केली आहे. आतापर्यंत सुमारे ३ कोटी १० लाख आयकर रिटर्न भरले आहेत. त्यापैकी २ कोटी ९० लाखांहून अधिक रिटर्न करदात्यांनी पडताळले आहेत. प्राप्तिकर विभागाने त्यापैकी ९४.५३ लाख रिटर्नची प्रक्रियाही केली आहे.

आयकर रिटर्नच्या सध्याच्या नियमांनुसार या हंगामात ३१ डिसेंबरपर्यंत रिटर्न भरता येणार आहे. ३१ जुलै २०२४ पर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न भरणे मोफत आहे. अंतिम मुदतीनंतर, करदात्याकडे उशीरा रिटर्न भरण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत वेळ आहे, पण त्यासाठी करदात्याला दंड भरावा लागेल.

दंडाची रक्कम करदात्याच्या वार्षिक उत्पन्नावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, जर करदात्याचे वार्षिक उत्पन्न ५ लाख रुपये किंवा त्याहून कमी असेल, तर त्याला विलंबित रिटर्न फाइलवर १००० रुपये दंड भरावा लागेल. जर करदात्याचे वार्षिक उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्याला ५,००० रुपये दंड भरावा लागेल. याशिवाय करदात्याला त्याच्या कराच्या रकमेवर व्याजही द्यावे लागेल.

आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै आहे. जसजशी मुदत जवळ येत आहे, तसतशी रिटर्न भरण्याचा वेग वाढत आहे. प्राप्तिकर विभागाच्या फायलिंग पोर्टलवर लॉगिन करणाऱ्यांची संख्या वाढल्याने अडचणी येत आहेत.

टॅग्स :इन्कम टॅक्सकर