टाटा ग्रुपची कंपनी टाटा स्टील युरोपमध्ये आर्थिक अडचणीत आली आहे. तेथील युके सरकारने टाटाला मोठी आर्थिक मदत देऊनही आज अखेर टाटाने दोन ब्लास्ट फर्नेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कंपनीतील हजारो कर्मचाऱ्यांची नोकरी गेली आहे.
ब्रिटनच्या साऊथवेल्समधील पोर्ट टॅलबोटमध्ये टाटा स्टीलची कंपनी आहे. येथील दोन ब्लास्ट फर्नेस बंद करण्याचा निर्णय टाटाने आज जाहीर केला आहे. आर्थिक कारण असले तरी कंपनीने पर्यावरण अनुकूल कामकाजात बदल करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे कारण दिले आहे.
एक दशकाहून अधिक काळ झालेले नुकसान आणि पारंपारिक ब्लास्ट फर्नेसेसपासून अधिक टिकाऊ, पर्यावरणपूरक स्टील व्यवसायात बदल करण्याचे उद्दिष्ट या योजनेतून आहे, असे टाटाने म्हटले आहे. कंपनी पारंपरिक ब्लास्ट फर्नेसच्या जागी इलेक्ट्रिक आर्क फर्नेस आधुनिक तंत्रज्ञानाने वापरणार आहे. या बदलामुळे ब्रिटनमधील कार्बन उत्सर्जन दरवर्षी 5 दशलक्ष टनांनी कमी होईल, असे निवेदनात म्हटले आहे. याशिवाय कंपनीची उत्पादने पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून सुरक्षित असतील, असाही दावा करण्यात आला आहे.
टाटा स्टीलने उत्सर्जन आणि खर्च कमी करण्याची योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत, प्लांटमधील दोन ब्लास्ट फर्नेस इलेक्ट्रिक आर्क फर्नेसने बदलण्यात येतील. मात्र, पोर्ट टॅलबोट प्लांटमधील दोन्ही ब्लास्ट फर्नेसेस बंद झाल्यामुळे कोकिंग ओव्हन आणि स्टीलचे दुकान ही युनिट्सही बंद होणार आहेत. कोक ओव्हन बॅटरी प्लांट्समधून मोठ्या प्रमाणावर कार्बन उत्सर्जन होते. याशिवाय या प्लांटमध्ये मजुरांची जास्त गरज असते.