मुंबई : गेल्या २ मे पासून जमिनीवर स्थिरावलेल्या गो-फर्स्ट कंपनीने गेल्या तीन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे पगार थकवले होते. त्यानंतर कंपनीला मोठ्या प्रमाणावर गळती लागली होती. ही गळती थांबविण्यासाठी अखेर कंपनीने कर्मचाऱ्यांचे पगार करण्याची घोषणा केली आहे. आगामी काळात असलेले सणासुदीचे दिवस लक्षात घेता कर्मचाऱ्यांचे पगार त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची घोषणा कंपनीने केली आहे.
कंपनीने दिवाळखोरीचा अर्ज दाखल केला होता. त्यानंतर आता कंपनीवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. कंपनीच्या पुनरुज्जीवनाची प्रक्रियादेखील सुरू झाली आहे. मात्र, कंपनीने गेल्या तीन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना पगार दिला नव्हता. काही दिवसांपूर्वी कंपनीच्या ५०० वैमानिकांनी नोकरी सोडून अन्य कंपनीत नोकरी स्वीकारली होती.
अर्थसाहाय्यामुळे झाले शक्यया पार्श्वभूमीवर ही कर्मचारी गळती रोखण्यासाठी कंपनीला पगार करणे गरजेचे ठरले होते. दैनंदिन खर्च व पगार यासाठी कंपनीला १०० कोटी रुपयांची गरज होती. कंपनीला १०० कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य मिळाले असून, त्यानंतर आता कंपनीने कर्मचाऱ्यांचे पगार करण्याची घोषणा केली आहे.