डिजिटल इंडियात अनेक गोष्टी, वस्तू ऑनलाईन झाल्या. विशेष म्हणजे ह्या ऑनलाईन सर्व्हीसला लोकांनी भरगोस प्रतिसादही दिला. त्यामुळे, ऑनलाईन शॉपिंग, ऑनलाईन तिकीट बुकींग, ऑनलाईन खेरदी आणि ऑनलाईन फुड ऑर्डर करणाऱ्यांची संख्याही देशात मोठी आहे. जानेवारी महिन्यात झोमॅटोकडून यासंदर्भात आकडेवारीही जाहीर करण्यात आली होती, ती कोट्यवधींमध्ये होती. त्यावरुन, झोमॅटो आणि स्विगी यांसारख्या ऑनलाईन खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या कंपन्यांवर लोकांचा प्रतिसाद असून त्यांवर विश्वासही आहे. लोकांचा हाच विश्वास जपण्यासाठी झोमॅटोकडून हिरव्या रंगाचा नवा ड्रेस कोड सुरू करण्यात आला होता. मात्र, नेटीझन्सने ट्रोल केल्यानंतर कंपनीने हा निर्णय मागे घेतला आहे.
लाल रंगातील टी-शर्ट आणि चुचाकीवरुन धावणारे झोमॅटो बॉय तुम्हाला दिसून येतील. मुंबईचा डब्बेवाला ज्याप्रमाणे डबे पोहोच करतो, त्याचप्रमाणे झोमॅटोकडून ग्राहकांना हवं त्या ठिकाणी हवं ते अन्नपदार्थ पोहोचवले जातात. त्यात, व्हेज आणि नॉन व्हेज या दोन्ही पदार्थांचा समावेश आहे. झोमॅटोवरुन बिर्याणी हे सर्वात आवडीचं फूड असल्याचंही आकडेवारीतून समोर आलं होतं. तर, व्हेज पदार्थांच्या कोट्यवधी ऑर्डर्स झोमॅटोला मिळताता. आपल्या शाकाहरी ग्राहकांचा हाच विश्वास जपण्यासाठी झोमॅटोने ड्रेसकोडमध्ये बदल केला होता. व्हेज ग्राहकांना ऑर्डर पुरवणाऱ्या झोमॅटो बॉय किंवा गर्ल्स यांना हिरव्या रंगाचा ड्रेसकोड देण्याचा निर्णय कंपनीचे संस्थापक दीपींदर गोयलवार यांनी घेतला होता. मात्र, नेटीझन्सने ट्रोल केल्यानंतर त्यांनी आपला निर्णय मागे घेतला आहे.
दीपींदर गोयल यांनी शुद्ध शाकाही ग्राहकांना फूड डिलिव्हरी देण्याच्या संकल्पनेतून हिरव्या रंगाचा ड्रेसकोड लागू केला. मात्र, व्हेज आणि नॉन व्हेज असा भेद का करता म्हणत गोयल यांच्यावर नेटीझन्स चांगलेच भडकल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे यातून धार्मिक भेदभाव होत असल्याचा आरोपही अनेकांनी केला. त्यानंतर गोयल यांनी हा विषय धार्मिक भेदभावाचा नसून शाहाकारी ग्राहकांच्या विश्वासासाठी घेण्यात आलेला निर्णय असल्याचं स्पष्ट केलं. मात्र, तरीही नेटीझन्सकडून होत असलेल्या विरोधानंतर अखेर झोमॅटोने हा निर्णय मागे घेतला आहे. तसेच, आपल्या सर्वच कर्मचाऱ्यांचा कलर कोड पूर्वीप्रमाणेच लाल राहील, असेही स्पष्ट केले.
दीपेंदर गोयल यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली, आम्ही आमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचणाऱ्या रायडर्संच्या जर्सीत केलेला बदल मागे घेत आहोत. आता, सर्वच शाकाहरी व मासांहरी ऑर्डर्स पुरवणारे झोमॅटो रायडर्स हे पूर्वीच्या लाल रंगातील जर्सीतच दिसून येतील. मांसाहारी आणि प्युजर व्हेज फ्लीट या दोन्हीसाठी आता एकच जर्सी असेल. आमच्या रायडर्संची सुरक्षा हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आम्ही तुमच्या सूचनांचं स्वागत करतो. तसेच, कुठलाही गर्व न बाळगता तुमचं म्हणणं सातत्याने ऐकत जाऊ, असेही गोयल यांनी ट्विटरवरुन म्हटलं आहे.
दरम्यान, गोयल यांच्या प्युअर व्हेज फ्लीट संदर्भातील पहिल्या ट्विटवर अनेकांनी टीकात्मक प्रतिक्रिया दिल्या. तसेच, अनेक सोसायट्यांमध्ये झोमॅटो रायडर्संना त्रास सहन करावा लागेल, याबद्दलही भूमिका मांडली. त्यानंतर, दीपेंदर गोयल यांनी आपल्या भूमिकेत बदल केला असून ग्राहकांना व नेटीझन्सला आपली बाजू समजून सांगितली. तसेच, त्यांच्या सूचनांचे स्वागतही केले.