नवी दिल्ली : २0१६-१७ या वित्त वर्षासाठी ईपीएफ ठेवींवर ८.६५ टक्के व्याज देण्याच्या प्रस्तावास वित्त मंत्रालयाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती केंद्रीय श्रममंत्री बंडारू दत्तात्रय यांनी दिली. दत्तात्रय यांनी एका निवेदनात म्हटले की, ईपीएफवर ८.६५ टक्के व्याजदरास वित्त मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. आता त्यासंबंधीचे पत्र येईल. औपचारिक चर्चा संपली आहे. या व्याजदरास ईपीएफओच्या विश्वस्त मंडळाने डिसेंबरमध्ये मंजुरी दिली होती. तथापि, सरकारकडून त्याला हिरवा कंदील मिळतो की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात होती. मात्र, वित्त मंत्रालयाने ही मंजुरी दिल्याने आता याबाबतची अनिश्चितता संपली आहे. देशभरात ईपीएफओचे ४ कोटी सदस्य आहेत. या सर्व सदस्यांना याचा लाभ होणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
पीएफच्या ८.६५ टक्के व्याजदरास अर्थ खात्याची मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2017 2:17 AM