Join us

निर्मला सीतारामन आज RBI बोर्डाला संबोधित करणार, अर्थसंकल्पावर होणार चर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2019 9:05 AM

अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी पेट्रोल आणि डिझेलवर प्रति लीटर १ रुपया अतिरिक्त अबकारी कर आणि रस्ते व पायाभूत सुविधांसाठी १ रुपया अतिरिक्त उपकर आकारला आहे.

नवी दिल्ली : देशातील पहिल्या पूर्णवेळ अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाला संबोधित करणार आहेत. अर्थसंकल्प संसदेत सादर केल्यानंतर नेहमीप्रमाणे अर्थमंत्री केंद्रीय भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळासोबत बैठक घेतात. त्याच परंपरेनुसार निर्मला सीतारमण आज भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळासोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीत अर्थसंकल्पात वार्षिक नुकसान कमी करण्यासाठी घेतलेल्या निर्णयांसोबत अन्य विषयांवर चर्चा होणार आहे. 

फेब्रुवारी महिन्यातील अंतरिम अर्थसंकल्पाच्या तुलनेत गेल्या शुक्रवारी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात 6,000 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी पेट्रोल आणि डिझेलवर प्रति लीटर १ रुपया अतिरिक्त अबकारी कर आणि रस्ते व पायाभूत सुविधांसाठी १ रुपया अतिरिक्त उपकर आकारला आहे. या माध्यमातून एका वर्षात १२०० कोटी रुपयांचा निधी उभारता येणार आहे. कारण, महागाई दर ४ टक्क्यांपेक्षा कमी आहे आणि जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती कमी होत आहेत. त्यामुळे सरकारने परिस्थितीचा पूर्ण फायदा उठविला.

यापूर्वीचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आर्थिक वर्ष २०१९ मध्ये पेट्रोल, डिझेलवरील कराच्या माध्यमातून २.५७ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम उभा केली होती. तेव्हापासून पेट्रोलियम उत्पादनांपासून कर जमा करण्याची पद्धत सुरु आहे. २०१३-१४ मध्ये हा कर ८८,६०० कोटी होता. नंतरच्या काळात त्यात मोठी वाढ झालेली दिसून येते. 

टॅग्स :निर्मला सीतारामनभारतीय रिझर्व्ह बँक