नवी दिल्ली - भारतीय बँकांचे 9 हजार कोटी रुपये बुडवून पळालेला किंगफिशर कंपनीचा मालक विजय मल्ल्याच्या वक्तव्याने देशभर खळबळ उडाली. त्यानंतर, अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याबाबत खुलासा केला आहे. जेटली यांनी एक पत्र लिहून, 2014 पासून मी मल्ल्याला कुठलिही भेट दिली नसल्याचे म्हटले. तसेच मल्ल्याचे विधान निरर्थक असून त्यामध्ये किंचितही तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण जेटलींनी दिले आहे.
विजय मल्ल्याने आज लंडन येथील वेस्टमिंस्टर न्यायालयात हजेरी लावली होती. मल्ल्याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यासाठी लंडनमधील वेस्टमिंस्टर न्यायालयात हा खटला सुरू आहे. त्यावेळी, मी देश सोडण्यापूर्वी या व्यवहारसंदर्भात सेटलमेंट करण्यासाठी अर्थमंत्र्यांना भेटलो होतो. मात्र, बँकांनी माझ्या सेटलमेंट लेटरवर आक्षेप घेतला. त्यानंतर मी देश सोडण्याचा निर्णय घेतला, असे मल्ल्याने माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. त्यानंतर, देशभरात खळबळ उडाली. त्यामुळे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्र जारी करुन मल्ल्याचा दावा खोडून काढला आहे. तसेच 2014 पासून आजपर्यंत मी मल्ल्याला भेटीसाठी कधीही वेळ दिली नसल्याचे जेटलींनी म्हटले. मल्ल्याचे वक्तव्य धादांत खोटे आहे. मल्ल्या हे राज्यसभा सदस्य आहेत. त्यामुळे अनावधानाने त्यांची आणि माझी भेट झाली होती. खासदार असल्यामुळे मल्ल्या सभागृहात हजर राहत होते. एकदा मी माझ्या बंगल्याबाहेरुन रुममध्ये जात होतो. त्यावेळी मल्ल्याची आणि माझी अनावधानाने भेट झाली होती. त्याच भेटीचा गैरफायदा घेत मल्ल्याने अत्यंत खोटे विधान केल्याचे अरुण जेटली यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
जेटलींचे पत्र