FM Nirmala Sitharaman : मुंबईत गेल्या काही वर्षांपासून घरांच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. मुंबईतील उंच इमारतीमधील घरांच्या किमती सर्वसाम्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. जगात सर्वात महागडी घरे मिळण्यामध्ये मुंबईचा समावेश आहे. अशातच मुंबईतल्या घरांच्या किमतींबाबत बोलताना देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी भाष्य केलं आहे. एका ब्रोकरच्या प्रश्नाला उत्तर देताना सीतारमण यांनी याबाबत भाष्य केलं. सीतारमण यांनी दिलेल्या उत्तराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रिअल इस्टेट किंवा शेअर बाजारातील विविध प्रकारच्या करांबाबत भाष्य केलं. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज अर्थात बीएसईच्या एका कार्यक्रमात एका स्टॉक ब्रोकरने अर्थमंत्र्यांना शेअर बाजारातील व्यवहार आणि घर खरेदीवर सरकारकडून लावलेल्या विविध प्रकारच्या करांबाबत प्रश्न विचारला होता. या प्रश्नावर अर्थमंत्र्यांकडून गांभीर्याने उत्तर अपेक्षित होते. मात्र त्यांनी ते विनोदी पद्धतीने त्यावर उत्तर दिल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झालीय.
एका स्टॉक ब्रोकरने सांगितले की,आम्ही पैसे गुंतवतो आणि रिस्क घेतो. पण सरकार स्लीपींग पार्टनर बनून जातं. सरकार जीएसटी, आयजीएसटी, मुद्रांक शुल्क, सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स आणि दीर्घकालीन भांडवली नफा करातून अधिक कमाई करत आहे." सरकार मुद्रांक शुल्क आणि जीएसटीच्या माध्यमातून घर खरेदीदारांकडून कमाई करते. त्यामुळे सरकार मर्यादित साधनसंपत्ती असलेल्या लोकांना घरे खरेदी करण्यासाठी कशी मदत करेल किंवा ब्रोकर इतका प्रचंड कर कसा भरणार? असा सवाल स्टॉक ब्रोकरने केला होता.
यासोबत ब्रोकरने मुंबईत घर खरेदीसाठी भरमसाठ कर लागत असल्याचा मुद्दाही उपस्थित केला. मुंबईत घर खरेदी करायला मुद्रांक शुल्क आणि जीएसटीच्या रूपात ११ टक्के कर भरावा लागत असल्याचे त्याने सांगितले. मुंबईसारख्या शहरात मी घर घेतो तेव्हा ११ टक्के रक्कम माझ्या खिशातून जाते. त्यामुळे अशा माणसाला मदत करण्यासाठी तुमच्याकडे कोणती योजना आहे? असाही सवाल केला. तसेच सरकारवर त्यांचा नफा काढून घेत असल्याचा आरोप करत असताना, मुंबईत घर खरेदी करणे हे दुःस्वप्न असल्याचा दावाही ब्रोकरने केला.
यावर सीतारामन यांनी मजेशीर अंदाजात उत्तर दिले. स्लीपींग पार्टनर इथे बसून उत्तर देऊ शकत नाही, असं निर्मला सीतारमण म्हणाल्या. सीतारमण यांच्या या वक्तव्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. आम्हाला अर्थमंत्र्यांकडून काही गंभीर उत्तरांची अपेक्षा होती असं नेटकऱ्यांनी म्हटलं.
दरम्यान, २०२४ मध्ये, वांद्रे, कुलाबा, मलबार हिल आणि जुहूसह शहरातील सर्वात महागड्या भागांमध्ये २ लाख हा प्रति चौरस फूटांचा दर झाला आहे. त्यामुळे घरांच्या किमतीचा नवा विक्रम होण्याची शक्यता आहे. तसेच नो ब्रोकरच्या मते, मुंबईत फ्लॅटची सरासरी किंमत ६५ लाख ते ९ कोटी रुपये आहे. १ बीएचकेची सरासरी किंमत ६४.५ लाख रुपये आहे. तर २ बीएचकेची किंमत १.५ कोटी रुपये आहे. तीन बीएचकेची किंमत ३ कोटी रुपये आणि ४ बीएचकेची किंमत ९ कोटी आहे.