केंद्र सरकारचं वाढत्या महागाईवर लक्ष असून निश्चित वेळी बॅंकाचं खासगीकरण केलं जाईल, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. याशिवाय त्यांनी २ हजारची नोट चलनातून माघार घेण्याच्या निर्णयावरून कॉंग्रेस नेते पी चीदंबरम यांना त्यांच्या विधानावरून फटकारले. हे भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे निर्णय असतात, यामध्ये सरकारचा हस्तक्षेप नसल्याचे त्यांनी सांगितले.
पी चीदंबरम यांच्यावर टीका माजी अर्थमंत्री पी चीदंबरम यांनी २ हजारची नोट चलनातून मागे घेण्याच्या निर्णयाला केंद्र सरकारशी जोडले होते. तसेच यावरून अर्थव्यवस्थेचे नुकसान होईल अशी भीती वर्तवली होती. यावर बोलताना सीतारामन यांनी चीदंबरम यांच्या विधानाची खिल्ली उडवली. "माजी अर्थमंत्री चिदंबरम यांना चांगलं माहिती आहे की, याबद्दलचा निर्णय आरबीआय घेत असते. याशिवाय चलनाचे आयुष्यमान देखील संपुष्टात आले होते. मला वाटते की आपण सर्वांनी परिस्थिती समजून घेणे आवश्यक आहे. तसेच त्यांनी सांभाळलेल्या कार्यालयाबद्दल योग्य टिप्पणी करणे किंवा मत मांडण्याबद्दल न बोलणेच चांगले होईल", असं सीतारामन यांनी चीदंबरम यांच्या विधानाबद्दल बोलताना म्हटले.
महागाईवर सरकारचं लक्षसातत्याने वाढत असलेल्या महागाईवर सरकार सतत लक्ष ठेवून आहे, असंही सीतारामन यांनी सांगितलं. याशिवाय केंद्र सरकार महागाई कमी करण्यावर लक्ष ठेवून आहे. देशातील महागाई दरात आता घसरण झाली असून तो ४.८ टक्क्यांवर आला आहे. सरकार स्थानिक बाजारांवरही लक्ष ठेवत आहे, जेणेकरून महागाई नियंत्रणात ठेवता येईल. महागाई रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, ते वेळीच व्हायला हवे, असं अर्थमंत्री सीतारामन यांनी अधिक सांगितले.
दरम्यान, सरकारी बँकांचे खासगीकरण निश्चित वेळेत केले जाईल, असे सीतारामन यांनी स्पष्ट केले. सरकार आपल्या वेळापत्रकापासून मागे हटणार नाही. सरकार आपल्या खासगीकरणाच्या योजनेवर ठाम असून ते वेळेत पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले.