नवी दिल्ली : केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषित केलेले ताजे प्रोत्साहन पॅकेज आर्थिक घडामोडींना चालना देण्यासाठीच आहे, असे प्रतिपादन नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीवकुमार यांनी केले.
वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी कालच ७३ हजार कोटी रुपयांच्या नव्या आर्थिक प्रोत्साहकाची घोषणा केली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना उत्सव अग्रीम आणि एलटीसीच्या जागी कॅश व्हाऊचर यांचा त्यात समावेश आहे. ग्राहक वस्तूंच्या मागणीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी हे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. राजीवकुमार यांनी आपल्या टिष्ट्वटमध्ये म्हटले की, वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी आम्हाला दिलेल्या आश्वासनानुसार देशांतर्गत मागणीला संजीवनी देणे आणि त्याद्वारे आवश्यक आर्थिक घडामोडींना गती देणे यासाठी ताज्या प्रोत्साहन पॅकेजची घोषणा केली आहे. ताज्या प्रोत्साहकाची वेळ अचूक आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर तसेच सुधारणांचे कोंब मजबूत होत असताना प्रोत्साहकाची घोषणा झाली आहे. प्रोत्साहकाचे परिणाम प्रत्यक्ष रकमेपेक्षा किती तरी अधिक असतील. आगामी काळात उच्च आर्थिक घडामोडी त्यामुळे घडून येतील.
सीतारामन यांनी केलेल्या घोषणेनुसार, ११,५७५ कोटी रुपये एलटीसी भत्ता म्हणून केंद्रीय कर्मचाऱ्यांना तसेच सार्वजनिक उपक्रमातील कर्मचाऱ्यांना दिले जातील. हा पैसा त्यांना ३१ मार्चपूर्वी खर्च करावा लागेल. याशिवाय केंद्र सरकारच्या सर्व कर्मचारी-अधिकाºयांना व्याजमुक्त १० हजार रुपयांचे उत्सव अग्रीम (फेस्टिव्हल अॅडव्हान्स) देण्यात येईल. हा अग्रीम प्री-पेड रूपे कार्डच्या स्वरूपात मिळेल. हा पैसाही ३१ मार्च २०२१ पूर्वी खर्च करावा लागेल.