चेन्नई - भाजपचे मिशन महाराष्ट्र म्हणत बारामती लोकसभा मतदारसंघात काही दिवसांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सितारमण आल्या होत्या. त्यावेळी, महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर त्यांनी टीका केली. तर, देशात महागाई नसल्याचं विधान केल्यामुळेही त्या चांगल्याच चर्चेत होता. मात्र, सध्या भाजीमंडईत जाऊन भाजी खरेदी करतानाचा अर्थमंत्र्यांचा व्हिडिओ समोर आला आहे. अर्थमंत्र्यांनी स्वत: मंडईत जाऊन हाताने निवडून भाजी खरेदी केली. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सीतारामन शनिवारी चेन्नईतील भाजी मार्केटमध्ये खरेदीसाठी पोहोचल्या. यावेळी त्यांनी हाताने निवडून रताळे खरेदी केल्याचे व्हिडिओत दिसून येते. तसेच, भाजी खरेदी केल्यानंतर स्थानिक भाजीविक्रेते आणि स्थानिक लोकांशी गप्पाही मारल्या. चेन्नईतील मैलापूर भागात निर्मला सीतारामन यांची खरेदी चर्चेचा विषय ठरली. यावेळी, त्यांच्यासह फोटो काढण्यासाठी आणि त्यांचा मोबाईलमध्ये टिपण्यासाठी स्थानिकांनी गर्दी केल्याचं दिसून आलं.
अर्थमंत्री सीतारामन यांच्या कार्यालयाने ट्विट करून त्यांचा हा भाजी खरेदीचा व्हिडिओ शेअर केला आहे. चेन्नईच्या त्यांच्या दिवसभराच्या भेटीदरम्यान श्रीमती @nsitharaman यांनी मैलापूर मार्केटमध्ये भाजीपाला खरेदी केला, असेही कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत
डॉलरच्या तुलनेत गेल्या काही दिवसांपासून रूपयाचं मूल्य सातत्यानं घसरत आहे. यावर आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्टीकरण दिले आहे. "रुपया जगातील इतर चलनांच्या तुलनेत अधिक भक्कमपणे उभा राहिला आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया खूप मजबूत असल्याचे दिसून येत आहे," असे सीतारामन म्हणाल्या. रिझर्व्ह बँक आणि अर्थ मंत्रालय परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.