नवी दिल्ली: कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला उतरती कळा लागल्याचे पाहायला मिळत होते. मात्र, आता कोरोनाच्या तडाख्यातून हळूहळू सर्व क्षेत्रे सावरताना दिसत आहेत. याचा सकारात्मक परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. कोरोना संसर्गामुळे दोन वर्षे मागे गेलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला सरत्या आर्थिक वर्षात चांगलाच बूस्टर मिळाला आहे. केंद्र सरकारकडे जमा झालेल्या करवसुलीच्या आकड्यांतून ही बाब प्रकर्षाने समोर आली आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये करवसुलीतून २७.०७ लाख कोटी रुपयांचे विक्रमी उत्पन्न प्राप्त झाले आहे.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जाहीर केल्यानुसार सरत्या आर्थिक वर्षात प्रत्यक्ष करांच्या वसुलीत ४९ टक्क्यांची आणि अप्रत्यक्ष करांच्या वसुलीत २० टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. हे उत्पन्न अंदाजित उत्पन्नापेक्षा ( २२.१७ लाख कोटी) पाच लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. मागील आर्थिक वर्षात (२०२०-२१) करवसुलीतून केंद्राच्या तिजोरीत २०.२७ लाख कोटी रुपयांची भर पडली होती. प्रत्यक्ष करांमध्ये व्यक्ती, कॉर्पोरेट कंपन्यांकडून गोळा करण्यात येणाऱ्या प्राप्तिकराचा समावेश होतो. आर्थिक वर्ष २०२१-२२मध्ये प्रत्यक्ष करापोटी १४.१० लाख कोटी रुपयांची तिजोरीत भर पडली.
अप्रत्यक्ष करांच्या माध्यमातून १२.९० लाख कोटी रुपयांचे उत्पन्न
गेल्या वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात ११ लाख कोटी रुपयांचे उत्पन्न प्रत्यक्ष करांतून मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. अप्रत्यक्ष करांच्या माध्यमातून १२.९० लाख कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. हे उत्पन्न अंदाजित उत्पन्नापेक्षा १.८८ लाख कोटी रुपयांनी अधिक आहे. करोनामुळे मागील दोन वर्षांमध्ये अर्थव्यवस्थेला मरगळ आली होती. मात्र, केंद्र सरकारने देशभर हाती घेतलेल्या लसीकरण मोहिमेमुळे अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळाला असून, त्याचमुळे कर उत्पन्नांत मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापरामुळेही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करवसुलीत वाढ नोंदविण्यात आली आहे. याशिवाय केंद्र सरकारचे प्रयत्नही कारणीभूत आहेत, असे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे.
सवलतींशिवाय उत्पन्न वाढणे हे नव्या व्यवस्थेचे यश
आर्थिक वर्ष २०२१-२२मध्ये कंपनी करापोटी ८.६ लाख कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, गेल्या वर्षीच्या (२०२०-२१) तुलनेत (६.५ लाख कोटी रुपये) ते अधिक आहे. कराचे कमी दर आणि कोणत्याही सवलतींशिवाय उत्पन्न वाढणे हे नव्या व्यवस्थेचे यश असल्याचेही अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. या कालावधीत प्राप्तिकर विभागाने २.२४ लाख कोटी रुपयांचा परतावाही दिला. मार्च २०२२ अखेरीस वस्तू आणि सेवा कराचे (जीएसटी) एकूण उत्पन्न एक लाख ४२ हजार ९५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. या उत्पन्नामध्ये 'सीजीएसटी'पोटी मिळालेल्या २५,८३० कोटी रुपयांचा, 'एसजीएसटी'पोटी प्राप्त झालेल्या ३२,३७८ कोटी रुपयांचा, 'आयजीएसटी'द्वारे मिळालेल्या ७४,४७० कोटी रुपयांचा आणि उपकरांमुळे मिळालेल्या ९,४१७ कोटी रुपयांचा समावेश आहे.