Join us

संकट संपता संपेना... अवघ्या सात महिन्यांत Byju’s इंडियाच्या सीईओंनी सोडली साथ, कोण सांभाळणार धुरा?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 12:30 PM

बायजू इंडियाचे सीईओ अर्जुन मोहन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर केवळ ७ महिन्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. पाहा आता कोण सांभाळणार कंपनीची धुरा.

Byju crisis: एड्युटेक कंपनी बायजूस समोरील संकट संपता संपता नाहीये. आता बायजूस इंडियाचे सीईओ अर्जुन मोहन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आता बायजूसचे संस्थापक बायजू रवींद्रन दैनंदिन ऑपरेशनल काम सांभाळतील. अर्जुन मोहन यांनी पदभार स्वीकारून फक्त ७ महिने झाले होते. याचा अर्थ वर्षभरातच त्यांनी कंपनीची साथ सोडली आहे. 

काय म्हटलं कंपनीनं? 

बायजू इंडियाचे सीईओ अर्जुन मोहन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर केवळ ७ महिन्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. संस्थापक बायजू रवींद्रन दैनंदिन कामकाजाच्या जबाबदाऱ्या पुन्हा सुरू करत आहेत. रवींद्रन तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकदा पुनरागमन करत आहेत, असं कंपनीनं १५ एप्रिल रोजी दिलेल्या निवेदनात म्हटलंय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्जुन मोहन एक्स्टर्नल अॅडव्हायझरच्या भूमिकेत दिसणार आहेत. 

तीन डिव्हिजन एकत्र 

बायजूसमधील बदल अशा वेळी समोर आले आहेत जेव्हा कंपनीनं आपलं कामकाज द लर्निंग अॅप, ऑनलाइन क्लासेस अँड ट्युशन करिअर आणि टेस्ट प्रीप या तीन केंद्रित डिव्हिजन्समध्ये एकत्रित केलं आहे. या प्रत्येक युनिटमध्ये स्वतंत्र लीडर असतील जे कंपनीचा नफा सुनिश्चित करण्यासाठी स्वतंत्रपणे व्यवसाय चालवतील. 

आर्थिक संकटाचा सामना 

बायजूस सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देऊ शकली नाहीये, तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात देखील केली जात आहे. याशिवाय काही गुंतवणूकदारांमुळे त्यांना कायदेशीर लढाईही लढावी लागत आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांच्या पगाराशी संबंधित खर्चासह ऑपरेशनल आवश्यकता पूर्ण करण्यासाठी राइट्स इश्यूमधून २० कोटी डॉलर्स उभे केले होते.

टॅग्स :व्यवसाय