नवी दिल्ली : भारतीय बँकांमधे आजवर बँकेचे कर्मचारी आपल्या समस्या सोडवायचे. आपल्या व्यवहारासंबंधी प्रश्नांची उत्तरे द्यायचे. आता ग्राहकाला त्याच्या आर्थिक व्यवहारांबाबत माहिती देण्याचे काम बँक कर्मचाºयांऐवजी रोबोट करणार आहेत. बँक व्यवहारांसाठी अशा ब्लॉक चेनचा यापुढे वापर केला जाणार आहे की ज्या माध्यमातून ग्राहकाच्या प्रत्येक व्यवहाराची बँकेला आपोआपच माहिती प्राप्त होईल.
फिनटेक, डिजिटल बँकिंग अन् बँकेचे भविष्यातील सारे व्यवहार हायटेक करण्यावर विशेष भर देणारा एक खास अहवाल भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकताच तयार केला आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर तो उपलब्ध आहे. राष्ट्रीकृत तसेच सरकारी बँकांना आर्थिक तंत्रज्ञानाबाबत अद्ययावत बनवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने एका इंटर रेग्युलेटरी ग्रुपची स्थापना केली होती. या ग्रुपने फिनटेक व डिजिटल बँकिंग संबंधी सर्व मुद्यांचा बारकाईने अभ्यास करून हा अहवाल तयार केला आहे.
भारतीय बँकिंग व्यवस्थेत फिनटेकचा वापर करण्यावर रिझर्व्ह बँकेचा विशेष भर दिसतो आहे. बँकांचे व्यवहार अधिक सोपे अन् सरळ बनवणे हा रिझर्व्ह बँकेचा प्रमुख उद्देश तर आहेच, याखेरीज बँकिंग व्यवस्था अधिक सुरक्षित बनावी, ग्राहकाच्या आर्थिक व्यवहारांबाबत ई-अग्रिगेटर व्दारे सर्व बँकांकडून माहिती मिळण्याची व्यवस्थाही तयार व्हावी, यालाही रिझर्व्ह बँकेने विशेष प्राधान्य दिले आहे.
नव्या तंत्रज्ञाने परिपूर्ण अशा बँकिंग व्यवस्थेला रिझर्व्ह बँक आता कधी लागू करणार? या संदर्भात लवकरच एखादी अधिसूचना अथवा दिशा निर्देश बँकांना लागू केले जातात काय? याकडे आर्थिक क्षेत्रासह सर्वांचेच लक्ष आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेचाही वापर
प्रस्तावित व्यवस्थेत कृत्रिम बुद्धीमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स), ब्लॉक चेन व इंटरनेट आॅफ थिंग्ज या तीन गोष्टींचा मुख्यत्वे अंतर्भाव आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेव्दारे खातेदारांना रोबोटच्या मदतीने अधिक चांगवी सेवा दिली जाईल. मोठ्या वा अधिक गर्दीच्या बँक शाखांमध्ये खातेदाराची सारी कामे यामुळे अधिक सुरळीतपणे व वेळेत पूर्ण होऊ शकतील. ब्लॉक चेनव्दारे खातेदारांच्या आर्थिक व्यवहारांवर देखरेख ठेवण्याचे बँकांचे कामही तुलनेने सोपे होईल.
बँक कर्मचाऱ्यांऐवजी खातेधारकाला रोबो देणार आर्थिक सल्ला!
अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी रिझर्व्ह बँंकेचा पुढाकार; व्यवस्था सुरक्षित, सुरळीत, सोपी करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 12:48 AM2018-09-14T00:48:59+5:302018-09-14T06:41:41+5:30