Join us

पॅन कार्डावर आर्थिक कुंडली...!

By admin | Published: October 14, 2015 12:38 AM

वित्तीय व्यवस्थेत पॅन कार्डाची अपरिहार्यता रुजविण्यात सरकारला यश आल्यानंतर आता सरकारने काळ््या पैशाच्या शोधासाठी पॅन कार्डाच्या माध्यमातून नवीन यंत्रणा विकसित केली असून

मुंबई : वित्तीय व्यवस्थेत पॅन कार्डाची अपरिहार्यता रुजविण्यात सरकारला यश आल्यानंतर आता सरकारने काळ््या पैशाच्या शोधासाठी पॅन कार्डाच्या माध्यमातून नवीन यंत्रणा विकसित केली असून, लवकरच ही यंत्रणा प्राप्तिकर विभागाच्या मार्फत कार्यान्वित होणार आहे. याकरिता एक सॉफ्टवेअर विकसित केले असून या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून एका क्लिकवर प्राप्तिकर विभागाला संबंधित पॅन कार्डधारकाची आर्थिक कुंडली हाती लागणार आहे. उपलब्ध माहितीनुसार, ‘इन्कम टॅक्स बिझनेस अ‍ॅप्लिकेशन-पर्मनंट अकाऊंट नंबर’ असे या यंत्रणेचे नाव असून पॅन कार्डाशी संलग्न प्रत्येक व्यवहार ही यंत्रणा वाचू व नोंदवू शकेल. तसेच सर्व व्यवहारांची माहिती देऊ शकेल, असे हे सॉफ्टवेअर असून हे सॉफ्टवेअर देशभरातील प्राप्तिकर कार्यालयांतून कार्यान्वित करण्यात येणार आहे. सध्या बँक खात्यापासून ते कर्जापर्यंत किंवा जवळपास सर्वच आर्थिक व्यवहारांत पॅन कार्ड हे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे जेव्हा ग्राहक जिथे जिथे व्यवहार करेल, त्याचा अलर्ट पॅन कार्डाच्या व्यवस्थेत अपडेट होईल. विशेष म्हणजे, हे सॉफ्टवेअर विकसित करताना, कोणत्या व्यक्तीला कधी पॅन कार्ड जारी झाले तेव्हापासूनची माहिती उपलब्ध करून देण्यात यश आले आहे. नव्या सॉफ्टवेअरमुळे प्राप्तिकर खात्याचे काम अधिकच सुलभ होणार आहे. देशांतर्गत होणाऱ्या काळ््या व्यवहारांना चाप लावण्यासाठी तसेच त्याच अनुषंगाने कर संकलन वाढविण्याच्या दृष्टीने सरकार सध्या विविध उपायोजना करत असून हे नवे सॉफ्टवेअर हा त्याचाच एक भाग आहे. येत्या महिनाअखेरीस केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याहस्ते त्याचे अनावरण होणार आहे. >>पॅन कार्ड क्रमांक जिथे जिथे दिला आहे, तिथे ग्राहक ज्यावेळी व्यवहार करेल, तो व्यवहार या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून अपडेट होईल. ज्यावेळी एखाद्या ग्राहकाची माहिती तपासायची असेल त्यावेळी प्राप्तिकर विभागाचे अधिकारी संबंधित व्यक्तीचा केवळ पॅन कार्ड क्रमांक या सॉफ्टेवअरच्या माध्यमातून तपासतील व त्याद्वारे त्यांना त्या व्यक्तीला पॅन कार्ड जारी केल्यापासूनच्या दिवसाची सर्व माहिती मिळेल. >>१२५ कोटी लोकसंख्येच्या देशात सध्या जेमतेम १९ कोटी लोकांकडे पॅन कार्ड आहे. यातरी बनावट पॅन कार्डधारकांची संख्याही मोठी आहे. वित्तीय व्यवस्थेतील प्रत्येक घटकांत पॅन कार्ड अनिवार्य करण्याचे सरकारचे धोरण आहे. यामुळे स्वाभाविकच ज्यांच्याकडे पॅन कार्ड नाही, त्यांना ते प्राप्त करून घ्यावे लागले. परिणामी, पॅन कार्डधारकांची संख्या वाढतानाच, गैरप्रकार करणाऱ्यावर लक्ष ठेवणे तसेच आर्थिक शिस्त लावणे सुलभ होणार आहे.