नवी दिल्ली : देशांतर्गत वित्तीय संस्था आणि म्युच्युअल फंड यांना व्यवसाय करणे सुलभ व्हावे यासाठी कर नियमांचे सुसूत्रीकरण करण्यावर वित्तमंत्रालयाने भर दिला आहे. वित्तमंत्रालयाचे अधिकारी आणि विविध वित्तीय संस्थांचे व म्युच्युअल फंडाचे प्रतिनिधी यांच्यात येथे बैठक झाली. त्यात याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आर्थिक प्रकरणांचे सचिव शक्तिकांत दास म्हणाले की, काही कर कायद्यात सुधारणा करून त्या अधिक सुसंगत करण्याची सूचना करण्यात आली. त्याची आम्ही दखल घेतली आहे. सीबीडीटी आणि सीबीईसीचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. ते या सूचनांवर विचार करतील. करविषयक कायद्यासह किरकोळ क्षेत्रात भागीदारी वाढविणे, गुंतवणुकीचा आधार व्यापार बनविणे याबाबतही यावेळी चर्चा झाली. दास म्हणाले की, व्यवसाय करणे सुलभ व्हावे यासाठीच ही बैठक आयोजित करण्यात आली होती. वित्तीय बाजारात काही धोरणात्मक सुधारणा करण्यावर सरकारचा भर आहे त्यादृष्टीने यावेळी चर्चा झाली.
वित्तीय संस्था, म्युच्युअल फंडाचे कर सोपे करणार
By admin | Published: October 22, 2015 3:32 AM