मुंबई : ट्रायच्या नियमावलीची अंमलबजावणी केल्यानंतर केबलचे दर कमी होतील, असा विश्वास ग्राहकांना होता; मात्र प्रत्यक्षात या अंमलबजावणीनंतरही आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचा आरोप ग्राहकांकडून होत आहे. विविध पॅकेजच्या माध्यमातून केबलच्या वाहिन्या निवडल्या जात असल्या तरी त्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त रक्कम मोजावी लागत असल्याचे त्यांचे मत आहे. तर, दुसरीकडे, ब्रॉडकास्टर्सनी शेकडो पॅकेजेस् जाहीर केली असली तरी तांत्रिक अडचणींमुळे ५ ते ७ पेक्षा जास्त पॅकेजेस् लागू करता येत नसल्याच्या समस्येकडे केबल चालकांनी लक्ष वेधले.
ट्रायने सुरुवातीला दावा केल्याप्रमाणे ग्राहकांना वाहिन्यांची निवड करण्याचे स्वातंत्र्य मिळणार होते व केबलचा खर्च पूर्वीपेक्षा कमी होणार होता. मात्र, प्रत्यक्षात असे काहीही झालेले नसल्याने ग्राहकांमध्ये असंतोष आहे. ग्राहकांना ब्रॉडकास्टर्स व एमएसओकडून देण्यात आलेली पॅकेज स्वीकारण्याची सक्ती केली जात असल्याने ग्राहक नाराज आहेत. ट्रायनेदेखील जे ग्राहक आपल्या आवडीच्या वाहिन्या निवडणार नाहीत त्यांना सध्याच्या किमतीमध्ये बेस्ट फिट प्लॅन तयार करून देण्याचे निर्देश दिले होते. या निर्णयाचा लाभ ग्राहकांना होण्याऐवजी ब्रॉडकास्टर्स व एमएसओना होत असल्याचे चित्र आहे.
ग्राहकांच्या रोषाला मात्र केबल चालकांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे केबल चालकदेखील हवालदिल झाले आहेत. प्रत्यक्षात पॅकेजेस् बनवण्याचा अधिकार केबल चालकाकडे नसून ब्रॉडकास्टर्स व एमएसओकडे असल्याकडे ग्राहकांचे दुर्लक्ष होत आहे, असे मत केबल आॅपरेटर अॅण्ड डिस्ट्रिब्युटर असोसिएशन (कोडा)चे कोअर समिती सदस्य विनय राजू पाटील यांनी मांडले. ट्रायने ग्राहकहिताचा दावा करत नवी नियमावली लागू केली असली तरी त्यामध्ये ग्राहकांचे हित व केबल चालकांच्या हिताकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
वाहिन्यांची निवड प्रक्रिया गुंतागुंतीची
कंडिशन असिस्ट सिस्टिम (कॅस) या प्रणालीद्वारे दोन सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पॅकेज लागू केले जातात. ब्रॉडकास्टर्सनी शेकडो पॅकेजेस् जाहीर केलेली असली तरी प्रत्यक्षात या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कमाल ५ ते ७ पॅकेजेस् लागू करता येतात. त्यामुळे अनेक पॅकेजेस् लागू करणे अशक्य झाले आहे. वाहिन्यांची निवड करण्याची प्रक्रिया व त्या लागू करण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची असून, केबल चालकांसोबत याबाबत वाद होत असल्याचे मत ग्राहक अरविंद घाडी यांच्यासह अनेक ग्राहकांनी व्यक्त केले.
ट्रायच्या नियमावलीनंतरही आर्थिक भुर्दंड, ग्राहकांचा आरोप
ट्रायच्या नियमावलीची अंमलबजावणी केल्यानंतर केबलचे दर कमी होतील, असा विश्वास ग्राहकांना होता; मात्र प्रत्यक्षात या अंमलबजावणीनंतरही आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचा आरोप ग्राहकांकडून होत आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 12:55 AM2019-03-26T00:55:37+5:302019-03-26T00:56:01+5:30