Canada Finacial Condition : भारताशी पंगा घेणाऱ्या जस्टिन ट्रुडो यांचा देश कॅनडाची स्थिती सध्या बिकट झाली आहे. जीडीपीच्या तुलनेत त्यांचं हाऊसहोल्ड डेट १०३% पर्यंत पोहोचले आहे. ही आकडेवारी जगातील सर्वाधित आहे. हाऊसहोल्ड डेट म्हणजेच घरगुती कर्ज, याचा अर्थ त्या देशातील जनतेवर असलेलं कर्ज. यात व्याज आणि मुद्दल यांचा समावेश आहे. म्हणजे कॅनडाच्या एकूण जीडीपीपेक्षा त्या देशातील लोकांवर जास्त कर्ज आहे. हे कुटुंबांच्या डिस्पोजेबल उत्पन्नाची टक्केवारी म्हणून मोजलं जाते. कॅनडा आर्थिकदृष्ट्या अस्थिर परिस्थितीतून जात असल्याचं स्पष्ट झालं आहे.
ज्या देशांमध्ये हाऊस होल्ड डेट जास्त आहे, अशा देशांमध्ये कुटुंबांना घर खरेदी करण्यासाठी किंवा इतर गोष्टींवर खर्च करण्यासाठी जास्त कर्ज घ्यावं लागतं. अमेरिकेत नुकत्याच झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयामुळे कॅनडाची स्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे ट्रम्प यांनी आपल्या निवडणूक भाषणात आयातीवर भरमसाठ शुल्क लावण्याचं आणि नॉर्थ अमेरिका फ्री ट्रेड कराराचा आढावा घेण्याचं आश्वासन दिलं होतं. आता जर त्यांनी आपलं वचन पूर्ण केलं तर कॅनडाच्या अर्थव्यवस्थेत भूकंप येऊ शकतो. कॅनडाचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार अमेरिका आहे.
भारताची स्थिती काय?
कॅनडानंतर ब्रिटनमध्ये सर्वाधिक हाऊसहोल्ड डेट आहे. ब्रिटनच्या जनतेवर देशाच्या जीडीपीच्या ८० टक्के कर्ज आहे. त्याखालोखाल अमेरिका (७३ टक्के), फ्रान्स (६३ टक्के), चीन (६२ टक्के), जर्मनी (५२ टक्के), स्पेन (४८ टक्के) आणि इटली (३९ टक्के) यांचा क्रमांक लागतो. भारतात हे प्रमाण ३७ टक्के आहे. २०२१ मध्ये ते ३९.२% पर्यंत पोहोचलं होतं. परंतु त्यानंतर त्यात घट झाली आहे. दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमध्ये हे प्रमाण ३४ टक्के आहे. सौदी अरेबियात ३२ टक्के, रशियात २२ टक्के, इंडोनेशिया आणि मेक्सिकोत १६ टक्के आणि तुर्कस्तानमध्ये ११ टक्के इतकं हे प्रमाण आहे.