Join us

अलर्ट! 31 मार्च आधी करून घ्या 'ही' महत्त्वाची कामं अन्यथा बसू शकतो मोठा फटका, होईल नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 2:15 PM

Financial Work : 31 मार्च 2022 पर्यंत महत्त्वाची सर्व काम पूर्ण झाली नाहीत, तर तुम्हाला नवीन आर्थिक वर्षात त्रास सहन करावा लागू शकतो.

नवी दिल्ली - 31 मार्च 2022 रोजी आर्थिक वर्ष (Financial Year) संपणार आहेत. त्यासाठी आता फक्त काही दिवस उरले आहेत. 31 मार्च 2022 पर्यंत महत्त्वाची सर्व काम पूर्ण झाली नाहीत, तर तुम्हाला नवीन आर्थिक वर्षात त्रास सहन करावा लागू शकतो. मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे महिना संपण्याआधी ही कामं उरकून घ्या.

आधार आणि पॅन कार्ड लिंक

आधार आणि पॅन कार्ड लिंक (Aadhar-PAN Link) करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 आहे. तुम्ही तुमचे आधार आणि पॅन कार्ड अजून लिंक केले नसेल तर लवकरच लिंक करा. लिंक न केल्यास, तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय केले जाईल आणि तुम्ही कोणतेही आर्थिक व्यवहार करू शकणार नाही. 

इनकम टॅक्स रिटर्न

जर तुम्ही अद्याप 2021-22 च्या मूल्यांकन वर्षासाठी प्राप्तिकर रिटर्न (ITR) भरला नसेल, तर तुम्ही ते 31 मार्च 2022 पर्यंत भरणे आवश्यक आहे. या तारखेपर्यंत सुधारित आयटीआर देखील दाखल करता येईल. 

बँक खात्याचे केवायसी

जर तुमचे बँक खाते असेल आणि तुम्ही अद्याप बँक खात्याचे केवायसी (Bank Account KYC) केले नसेल तर ते लवकर करा. यापूर्वी ही तारीख 31 मार्च 2021 होती परंतु कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ही तारीख वाढवण्यात आली होती. आता तुमचे केवायसी 31 मार्चपर्यंत पूर्ण झाले नाही तर तुमचे आर्थिक व्यवहार थांबतील. 

करबचत गुंतवणूक

2021-22 या आर्थिक वर्षासाठी आयकर सवलत मिळवण्यासाठी, 31 मार्चपर्यंत गुंतवणूक करा. याचा अर्थ, कर बचत योजनांमध्ये गुंतवणूक करा, ज्यातून तुम्हाला कर सवलत मिळू शकते. 

एडव्हान्स टॅक्स

आयकर कायदा 208 अंतर्गत, 10,000 रुपयांपेक्षा जास्त करदायित्व असलेले करदाते आगाऊ कर (Advance Tax) भरू शकतात. तो 4 हप्त्यांमध्ये देऊ शकतो. तुम्ही शेवटचा हप्ता 15 मार्चपर्यंत जमा करू शकता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.