न्यूयाॅर्क : गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेतील आयटी कंपन्यांमध्ये माेठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात सुरू आहे. अमेरिकेतील भारतीय आयटी अभियंत्यांची यामुळे माेठी अडचण झाली आहे. ६० दिवसांमध्ये नाेकरी शाेधा किंवा मायदेशी परता, अशी त्यांची अवस्था झाली आहे. अनेक जणांचा अमेरिकेत कायमच्या नागरिकत्वाचा मार्ग बंद हाेण्याची दाट शक्यता आहे.
एका अहवालानुसार, यावर्षी अमेरिकेत आयटी क्षेत्रातील १ लाख ४६ हजार जणांच्या नाेकऱ्या गेल्या आहेत. त्यापैकी ५१ हजार जणांना तर नाेव्हेंबरमध्येच घरी बसावे लागले. यापैकी माेठ्या संख्येने परदेशी नागरिक आहेत. त्यातही भारतीयांची संख्या फार माेठी आहे. बरेच कर्मचारी असे आहेत जे गेल्या १२-१५ वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्यास आहेत. त्यांना ग्रीन कार्ड मिळण्याची शक्यता हाेती; परंतु नाेकरी गेल्यामुळे त्यांच्यावर संकट निर्माण झाले आहे. नवी नाेकरी न मिळाल्यास मुलाबाळांसह भारतात परतावे लागेल. अनेक मुलांचा जन्म अमेरिकेत झाला आहे. त्यामुळे या मुलांसमाेर वेगळ्याच अडचणी निर्माण हाेऊ शकतात. (वृत्तसंस्था)
एच-१बी व्हिसाधारकांना हाेणार अडचण
कंपन्यांनी नाेकरकपात केलीच आहे. शिवाय नव्या नाेकरभरतीला ब्रेक लावला आहे. परिणामी, स्थलांतरितांसाठी नाेकरीच्या संधी फारच कमी आहेत. ज्यांना आधीपासून एच-१बी व्हिसा मिळाला आहे, त्यांच्या हातात नवी नाेकरी शाेधण्यासाठी ६० दिवसांचाच अवधी आहे.
कंपन्यांना द्यावे लागतील २० हजार डॉलर्स
अमेरिकेत या कर्मचाऱ्यांना अशी कंपनी शाेधावी लागेल जी त्यांचा एच-१बी व्हिसा स्पाॅन्सर करेल. त्यांच्या ग्रीन कार्ड अर्जासाेबत २० हजार डाॅलर्स शुल्कही कंपनीला भरावे लागते.
५ लाखांहून अधिक एच-१बी व्हिसाधारक
अमेरिकेत सुमारे ५ लाखांहून अधिक एच-१बी व्हिसाधारक आहेत. त्यात सर्वाधिक भारतीय आहेत. त्यापाठाेपाठ चीनचा क्रमांक लागताे. यावर्षी ८५ हजार एच-१बी व्हिसासाठी ४ लाख ८० हजार जणांनी अर्ज दाखल केले आहेत.
गेल्या २० वर्षांत ४४ टक्के वाढ
अमेरिकेत वर्ष २००० ते २०१९ या कालावधीत विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील मनुष्यबळाची मागणी प्रचंड वाढली. प्राेग्रामिंग, काेडिंग व इतर काैशल्यामुळे मजबूत पगारही मिळाला.
अमेरिकेतील नाेकर कपातीची व्याप्ती आयटीव्यतिरिक्त इतर क्षेत्रापर्यंत वाढली आहे.
ॲमेझाॅन २०,०००
मेटा ११,०००
डाेअरडॅश १,२५०
ट्विटर ३,७००
मायक्राेसाॅफ्ट २,०००
क्रॅकेन क्रिप्टाे
एक्स्चेंज १,१००
स्पेक्ट्रम फार्मा ३०%
इंटेल २०%
याशिवाय पेप्सिकाे, अनअकॅडमी, वेदांतू, चार्जबी, इत्यादी कंपन्यांमध्येही कर्मचारी कपात करण्यात आली आहे.