बीजिंग : ब्रिटनला युरोपीय संघातून बाहेर पडण्याविषयीची (ब्रेक्झिट) अनिश्चितता त्वरित संपवा, असे आवाहन आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्टिन लेगार्ड यांनी केले आहे. ब्रेक्झिटविषयीच्या अनिश्चिततेमुळे जगाच्या आर्थिक वृद्धीवर परिणाम होत आहे, असा इशाराही लेगार्ड यांनी दिला.लेगार्ड यांनी चीनचे पंतप्रधान ली क्विंग यांची भेट घेतली. जागतिक बँक, जागतिक व्यापार संघटना आणि अन्य संस्थांच्या प्रमुखांशीही त्यांनी चर्चा केली. या आठवड्यात २0 प्रमुख अर्थव्यवस्थांच्या समूहाच्या वित्तीय अधिकाऱ्यांची बैठक होत आहे. या बैठकीपूर्वी लेगार्ड यांनी वरील मान्यवरांशी बातचीत केली. त्यानिमित्त त्यांनी पत्रकांना सांगितले की, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जागतिक वृद्धीचे यंदाचे अनुमान 0.१ टक्क्याने घटवून ३.१ टक्का केले आहे. याच आठवड्यात जारी करण्यात आलेल्या नाणेनिधीच्या अहवालात हा आकडा देण्यात आला आहे. लेगार्ड म्हणाल्या की, ब्रेक्झिटमुळे जागतिक अर्थव्यवस्थेची वाढ खुंटण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. ही अनिश्चितता संपवा ही आमची यासंदर्भातील पहिली आणि तातडीची शिफारस आहे. व्यापाराच्या अटी कोणत्या आहेत, ब्रिटन कोणत्या अटींनुसार जागतिक अर्थव्यवस्थेत वावरणार आहे, याची माहिती मिळते सर्वच आवश्यक आहे. (वृत्तसंस्था)
ब्रेक्झिटबाबतची अनिश्चितता संपवा
By admin | Published: July 23, 2016 5:14 AM