Join us

गुंतवणुकीची संधी! डिजिटल पेमेंट्स क्षेत्रातील ‘या’ कंपनीचा IPO येतोय; १.३३ लाख कोटींचे व्यवहार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 9:49 AM

विविध क्षेत्रातील कंपन्यांचे IPO शेअर मार्केटमध्ये सादर केले जात आहेत.

मुंबई: आताच्या घडीला शेअर मार्केटमध्ये मोठी तेजी दिसून येत आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार या संधीचा फायदा करून घ्यायच्या विचारात आहेत. यातच विविध क्षेत्रातील कंपन्यांचे IPO शेअर मार्केटमध्ये सादर केले जात आहेत. याचाही लाभ गुंतवणूकदार घेत असल्याचे सांगितले जात आहे. डिजिटल पेमेंट्स क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका कंपनीला सेबीकडून मंजुरी मिळाल्यानंतर आता या महिन्याच्या अखेरीला आयपीओ सादर केला जात आहे. 

फिनो पेमेंट्स बँक लिमिटेडचा (Fino Payments Bank) आयपीओ २९ ऑक्टोबर रोजी खुला होणार असून २ नोव्हेंबरपर्यंत सबस्क्रिप्शनसाठी उपलब्ध राहील. या अंतर्गत ३०० कोटी रुपयांचे नवीन शेअर्स विक्री केले जाणार आहेत. तसेच फिनो पे-टेक लिमिटेड ऑफर फॉर सेल अंतर्गत १.५६ कोटी इक्विटी समभागांची विक्री करणार असल्याचे सांगितले जात आहे. फिनो पे-टेकचा कंपनीमध्ये १०० टक्के हिस्सा आहे. फिनो पेमेंट बँकेत ब्लॅकस्टोन, ICICI ग्रुप, भारत पेट्रोलियम आणि आयएफसीसारख्या मोठ्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली आहे.

गरजा पूर्ण करण्यासाठी रक्कम वापरली जाणार

या IPO अंतर्गत मिळणारी रक्कम भविष्यातील भांडवली गरजा पूर्ण करण्यासाठी वापरली जाईल. या अंतर्गत कंपनीचा टियर-१ भांडवल आधार वाढवला जाईल. कंपनीचे टियर-१ भांडवल प्रमाण आर्थिक वर्ष २०२१ मध्ये ५६.२५ टक्के होते. या कंपनीचे लक्ष प्रामुख्याने डिजिटल आणि पेमेंट संबंधित सेवांवर आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे मार्च २०२१ पर्यंत सुमारे ४३.४९ कोटी व्यवहार झाले. या सर्व व्यवहारांचे एकूण मूल्य १.३३ लाख कोटी रुपये होते. आर्थिक वर्ष २०२१ मध्ये त्याचे एकूण उत्पन्न ७९१.०३ कोटी रुपये होते. जे गेल्या वर्षी ६९१.४० कोटी रुपये होते. या कालावधीत कंपनीचा नफा २०.४७ कोटी रुपये होता.

दरम्यान, फिनो पेमेंट्स बँक लिमिटेडसह Nykaa कंपनीचा आयपीओ सादर केला जाणार आहे. हा आयपीओ २८ ऑक्टोबर रोजी खुला होणार आहे. तर १ नोव्हेंबरपर्यंत गुंतवणूकदारांसाठी खुला असेल. कंपनीने १०८५ ते ११२५ दरम्यान याच्या शेअरची किंमत असू शकेल, असे सांगितले जात आहे.  

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारडिजिटलबँकिंग क्षेत्र