Hero Motocorp share Price : हीरो मोटोकॉर्पच्या अडचणी अद्यापही संपताना दिसत नाहीये. CNBC-TV18 च्या रिपोर्टनुसार, दिल्लीपोलिसांनी कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष पवन मुंजाल यांच्या विरोधात एफआयआर नोंदवलाय. या बातमीनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाली. कंपनीचे शेअर्स ३ टक्क्यांहून अधिक घसरल्यानं २९२५ रुपयांवर आले होते.
पीटीआयच्या रिपोर्टनुसार ईडीनं या वर्षी मनी लाँड्रिंग प्रकरणी पवन मुंजाल आणि अन्य काही लोकांविरोधात सर्च ऑपरेशन केलं होतं. तेव्हा ईडीनं मुंजाल यांच्या घरी, दिल्ली, गुरुग्राममधील व्यावसायिक संपत्तींवर छापा टाकला होता.
कंपनीनं काय म्हटलं होतं?
या छाप्यानंतर कंपनीनं एक निवेदन जारी केलं होतं. ईडीनं दिल्ली आणि गुरुग्रामच्या दोन कार्यालयांत छापा टाकला होता. सोबतच एक्झिक्युटिव्ह चेअरमन डॉ. पवन मुंजाल यांच्या घरावरही छापा टाकण्यात आला होता. कंपनी या तपास यंत्रणेला पूर्णपणे सहकार्य करत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
२०२२ मध्ये इन्कम टॅक्सचा छापा
मार्च २०२२ मध्ये कर चोरीप्रकरणी इन्कम टॅक्स विभागानं छापा टाकला होता. अधिकाऱ्यांनी यादरम्यान ८०० कोटी रुपयांच्या कथित अवैध खर्चांचा खुलासा केला होता. याशिवाय ते बनावट कंपन्यांशीदेखील संबधित असल्याचे संकेत मिळाले होते.
ईडीच्या तपासाची सुरुवात एबीआयसीची एक ब्रान्च डीआरआयच्या तक्रारीनंतर झाली होती. रिपोर्ट्सनुसार सीआयएसएफ कडून मिळालेल्या माहितीनुसार पवन मुंजाल यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली होती. ऑगस्ट २०१८ मध्ये ते दिल्लीहून लंडनला जात होते. सीआयएसफला त्यांच्या हँड बॅगमधून ८१ लाख रुपये किंमतीचं परदेशी चलन मिळालं होतं. कस्टम डिपार्टमेंटनं तेव्हा ते सीज केलं.