नवी दिल्ली :
अलीकडे घडलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर्सला आग लागण्याच्या घटना या उद्योगासाठी धोक्याचा इशारा आहेत, त्यावर एकत्रितपणे उपाय शोधण्याची गरज आहे, असे प्रतिपादन हीरो इलेक्ट्रिकचे व्यवस्थापकीय संचालक नवीन मुंजाळ यांनी केले आहे.
मुंजाळ यांनी म्हटले की, अशा घटनांमुळे बॅटरीच्या दर्जाबाबत सरकार अधिक कडक नियम करू शकते तसेच उत्पादनाचे लॉंचिंग किती लवकर केले जाऊ शकते, याबाबतच्या नियमांतही बदल होऊ शकतो. सरकारकडून वाहनांच्या उष्णता व्यवस्थापनाचे परीक्षण केले जाऊ शकते.
इलेक्ट्रिक वाहनांची योग्य तपासणी होणे आवश्यक आहे. त्यात कोणीही ‘शॉर्टकट’ शोधू नये. ‘शॉर्टकट’ तुम्हाला धोकादायक ठरू शकतो. या पार्श्वभूमीवर मला आगीच्या घटना उद्योगासाठी धोक्याचा इशारा वाटतात, असे त्यांनी म्हटले आहे.