मुंबई : दिवाळीला शुक्रवारी विक्रम संवत २०८१ च्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात तेजीचे फटाके फुटले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३३५.०६ अंकांनी अथवा ०.४२ टक्क्याने वाढून ७९,७२४.१३ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ९९ अंकांनी अथवा ०.४१ टक्क्याने वाढून २४,३०४.३५ अंकांवर बंद झाला.
सायंकाळी ६ ते ७ या वेळात शेअर बाजारात मुहूर्ताचे ट्रेडिंग झाले. बाजारातील मुहूर्त ट्रेडिंग हे १ तासाचे प्रतीकात्मक ट्रेडिंग असते. दरवर्षी दिवाळीच्या दिवशी सायंकाळी ते होते. शुक्रवारच्या मुहूर्त सौद्यांत निफ्टीमधील ५० पैकी ४२ कंपन्यांचे समभाग तेजीत राहिले. ८ कंपन्यांचे समभाग घसरले.
सोने ३००, चांदी १५०० रुपयांनी घसरली : सोने-चांदीच्या भावात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घसरण झाली. सोने ३०० रुपयांनी घसरून ७९ हजार ७०० रुपयांवर आले तर चांदीत थेट एक हजार ५०० रुपयांची घसरण होऊन ती ९७ हजार ५०० रुपयांवर आली.