चेन्नई : फटाके आणि शोभेच्या दारूचे देशभरातील प्रमुख उत्पादन केंद्र म्हणून ओळखल्या जाणाºया तामिळनाडूमधील शिवकाशी शहरातील शेकडो कारखान्यांमधील फटाक्यांचे उत्पादन मंगळवार, २६ डिसेंबरपासून बेमुदत बंद करण्याचा निर्णय कारखानदारांनी घेतला आहे.‘तामिळनाडू फायरवर्क्स अॅण्ड अॅमॉर्सेस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’च्या (टॅनफामा) बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेचे चिटणीस के. मरियप्पन यांनी सांगितले.प्रदूषणामुळे सर्वोच्च न्यायालयाने यंदा दिवाळीत दिल्लीत फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घातली. बंदी देशभर लागू करावी अशी याचिकाही न्यायालयात प्रलंबित आहे. यामुळे धंद्यात कमालीची अनिश्चितता निर्माण झाली आहे. दिल्लीतील बंदीमुळे एनसीआर, पंजाब, हरियाणा व चंदिगढमधीलही अनेक घाऊक फटाके व्यापाºयांचे दिवाळे निघाले. परिणामी घाऊक विक्रेत्यांनी पुढच्या वर्षासाठी मागणी नोंदवणे व आगाऊ रक्कम देणेही थांबविले. त्यामुळे तयार केलेले फटाके विकले जातील की नाही याची शाश्वती नसल्याने हा निर्णय घेतल्याचे संघटनेने स्पष्ट केले.गेली ८० वर्षे शिवकाशीमध्ये धंद्याचे जे ‘मॉडेल’ प्रस्थापित झाले आहे त्यानुसार घाऊक विक्रेत्यांकडून मिळणारी ९0 टक्के आगाऊ रक्कमच त्यांच्या भांडवलाची गरज भागवते. राहिलेले १० टक्के खेळते भांडवल बँकांकडून कर्जाऊ घेतले जाते. यंदा आगाऊ रक्कम न मिळाल्याने खेळते भांडवल नाही व माल तयार केला तरी तो विकला जाईल याची खात्री नाही, अशा दुहेरी कात्रीत येथील उद्योग सापडला आहे.मरियप्पन म्हणाले की, यंदा दिल्लीत दिवाळीत फटाके वाजले नाहीत तरी थंडी सुरू होताच तेथील हवेच्या प्रदूषणाची स्थिती पूर्वीसारखी असल्याचे स्पष्ट झाले. यावरून प्रदूषण व फटाक्यांचा काही संबंध नाही व असलाच तरी तो नाममात्र व नैमित्तिक असल्याचे दिसते. फटाकेबंदीमागे दिवाळीविरोधी लॉबी काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.ते म्हणाले की, शिवकाशी हे फटाके उत्पादनाचे प्रमुख केंद्र असले तरी धंद्यावर आलेले हे संकट केवळ शिवकाशीपुरते मर्यादित नाही. आम्ही यापूर्वी लढून थकलो. म्हणूनच आता सर्व संबंधितांनी देशपातळीवर एकत्र येऊन भावी रणनीती ठरवायला हवी.तमिळनाडू संघटनेने २८ डिसेंबर रोजी शिवकाशी येथे ‘फेडरेशन आॅफ फायरवर्क्स असोसिएशन्स’ची परिषद आयोजित केली आहे. त्यात फटाके उत्पादक, विक्रेते, विक्रेत्यांचे एजंट, कच्च्या मालाचे पुरवठादार, वाहतूकदार व कामगार संघटनांच्या प्रतिनिधींना बोलावले आहे. ‘आम्ही शिवकाशीवाले लढून दमलो आहोत. त्यामुळे दिवाळी व फटाक्यांच्या शत्रूंविरुद्धच्या लढ्यात तुमच्या सहभागाची आणि मदतीची मनापासून याचना करत आहोत,’ असे आवाहन करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)फटाके हा प्रामुख्याने वर्षभर चालणारा श्रमप्रधान लघुउद्योग आहे. सर्वांत मोठी मागणी दिवाळीत असली तरी वर्षभर उत्पादन करावे लागते. त्यामुळे देशव्यापी बंदीविषयी जो काही निर्णय द्यायचा तो लवकर घ्यावा. बंदी न घालण्याचा निर्णय उशिरा झाला तरी त्यामुळेही वर्षभराचा धंदा बुडेल.- के. मरियप्पन, चिटणीस, टॅनफामा
विक्रीची खात्री नसल्याने फटाक्यांचे कारखाने बंद! ८ लाख कामगारांवर बेकारीची कु-हाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 1:12 AM