Success Story: देशातील अनेक उद्योगपतींनी आपल्या कठोर संघर्षातून मोठे यश मिळवले आहे. देशातच नाही तर जगभरात त्यांचं नाव परिचयाचं आहे. आम्ही तुम्हाला एका व्यवसायिकाची यशोगाथा सांगणार आहोत, ज्यानं एका व्यवसायात सर्वस्व गमावल्यानंतर दुसरा व्यवसाय सुरू केला आणि कोट्यवधींची कंपनी उभी केली.
आम्ही बोलत आहोत प्रसिद्ध बांधकाम कंपनी दिलीप बिल्डकॉनचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दिलीप सूर्यवंशी यांच्याबद्दल. ही मध्य प्रदेशातील बांधकाम क्षेत्रात काम करणारी एक प्रसिद्ध कंपनी आहे. कंपनीनं देशभरातील महामार्ग आणि द्रुतगती मार्गांसह अनेक मोठ्या प्रकल्पांचे कॉन्ट्रॅक्ट पूर्ण केले आहेत. अलीकडेच दिलीप बिल्डकॉनला मध्यप्रदेश सरकारकडून ७०० कोटी रुपयांचा इन्फ्रा प्रोजेक्टही मिळालाय.
पहिल्या व्यवसायात अपयश
दिलीप बिल्डकॉनला नामांकित कंपनी बनवण्याची कहाणी अतिशय रंजक आहे. या कंपनीची स्थापना दिलीप सूर्यवंशी यांनी १९८७ मध्ये केली होती. जबलपूर विद्यापीठातून इंजिनिअरिंग पदवीधर असलेल्या दिलीप सूर्यवंशी यांना या क्षेत्रातील ३६ वर्षांचा अनुभव आहे. २०१६ मध्ये कंपनी शेअर बाजारात लिस्ट झाली होती.
सुरुवातीपासून दिलीप सूर्यवंशी यांना कधीही कोणत्याही कंपनीत कोणाच्या हाताखाली काम करण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे शिक्षणानंतर १९७९ मध्ये त्यांनी भोपाळ येथे भावाच्या सोयाबीन कारखान्याचं काम पाहण्यास सुरुवात केली. परंतु दुष्काळामुळे त्यांना हा व्यवसाय बंद करावा लागला. त्यानंतर त्यांनी स्वतःची बांधकाम कंपनी सुरू केली.
एका कर्मचाऱ्याला केलं भागीदार
१९९५ मध्ये त्यांनी देवेंद्र जैन या २१ वर्षीय इंजिनिअरला आपल्याकडे नोकरीवर ठेवलं. फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, दिलीप सूर्यवंशी देवेंद्र जैन यांच्या कामानं इतके प्रभावित झाले की त्यांनी नंतर देवेंद्र जैन यांना त्यांच्या व्यवसायातील ३१ टक्के भागीदारीसह भागीदार बनवलं. सध्या देवेंद्र जैन यांच्याकडे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी आहे. हुरून लिस्ट २०२१ नुसार दिलीप सूर्यवंशी यांची एकूण संपत्ती ४१०० कोटी रुपये होती, तर देवेंद्र जैन २३०० कोटींचे मालक आहेत.
दिलीप बिल्डकॉनच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार दिलीप सूर्यवंशी हे मध्य प्रदेश बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने सतत नावीन्यपूर्ण कामगिरी करून मोठी कामगिरीही केली आहे. देशातील सर्वात मोठी रस्ते बांधणी कंपनी बनण्याच्या ध्येयावर कंपनीनं आता लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केलीये.