नवी दिल्ली- देशात जीएसटी(वस्तू आणि सेवाकर) लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच एप्रिल महिन्यात जीएसटी वसुली 1 लाख कोटींच्या घरात पोहोचली आहे. महिन्याभरात सरकारनं 1 लाख कोटी रुपयांची वसुली केल्याची आकडेवारी केंद्रीय अर्थमंत्रालयानं जाहीर केली आहे. न्यूज एजन्सी एएनआयच्या वृत्तानुसार, एप्रिल महिन्यात 1,03,458 कोटींची जीएसटी वसुली झाली आहे. केंद्रीय वस्तू आणि सेवा करातून आतापर्यंत 18,652 कोटी रुपयांची वसुली झाली आहे. तर राज्य वस्तू आणि सेवा करातून आतापर्यंत 25,704 कोटी रुपये वसूल केले आहेत. तर या सर्व एकत्रित जीएसटी 50,548 कोटी रुपयांपर्यंत वसुली करण्यात आली आहे.
तर सेस 8554 कोटी रुपयांपर्यंत वसूल करण्यात आला आहे. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी एवढा जीएसटी वसूल झाल्यामुळे भागधारकांचे आभारही व्यक्त केले आहेत. जीएसटीला मिळालेलं हे ऐतिहासिक यश असून, वाढत्या आर्थिक हालचालींच्या दृष्टीनं फायदेशीर आहे. त्यामुळे मी करदात्यांचं अभिनंदन करतो, असं ट्विट अरुण जेटलींनी केलं आहे.
GST Revenue collection for April 2018 exceeds Rs.1 lakh crore.
— Ministry of Finance (@FinMinIndia) May 1, 2018
2017-18मध्ये ऑगस्ट 2017 ते मार्च 2018 या काळात जीएसटीद्वारे 7.19 लाख कोटी रुपयांचा महसूल सरकारला मिळाला होता. जुलैमधील वसुली मिळून 2017-18मधील जीएसटीचा एकूण महसूल 7.41 लाख कोटी रुपये होतो. यात 1.19 लाख कोटींचा सीजीएसटी 1.72 लाख कोटींचा एसजीएसटी आणि 3.66 लाख कोटींचा आयजीएसटी (आयातीवरील 1.73 लाख कोटी रुपये धरून) आहे. वित्त मंत्रालयाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, 2017-18 या वित्त वर्षातील आठ महिन्यांच्या काळासाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारांना देण्यात येणाऱ्या भरपाईपोटी 41,147 कोटी रुपये अदा करण्यात आले. 2015-16 हे आधार वर्ष धरून राज्यांचा महसूल 14 टक्क्यांच्या पातळीवर ठेवण्याचा निर्णय झालेला असून त्यानुसार केंद्राकडून राज्य सरकारांना भरपाई देण्यात येते. सूत्रांनी सांगितले की, गेल्या आठ महिन्यांत राज्यांचे महसुली अंतर हळूहळू कमी होत आहे. गेल्या वर्षी सर्व राज्यांचे एकत्रित सरासरी महसुली अंतर 17 टक्के होते.
महिन्याला सुमारे 90 हजार कोटी
याशिवाय 62,021 कोटी रुपये उपकराचेही (आयातीवरील 5,702 कोटींसह) सरकारला मिळाले आहेत. ऑगस्ट ते मार्च या काळातील सरासरी मासिक वसुली 89,885 कोटी रुपये राहिली आहे.