Go First Crisis: आर्थिक संकटात सापडलेल्या गो फर्स्टवरील संकटे वाढताना दिसत आहे. नुकतीच कंपनीने आपल्या दिवाळखोरीची माहिती दिली असली तरी या प्रकरणात एनसीएलटीची मंजुरी येणे बाकी आहे. विमान कंपनी दिवाळखोरीच्या वाटेवर असताना गो फर्स्टच्या कर्मचाऱ्यांचेही नुकसान होत आहे. कंपनीचे अनेक कर्मचारी, इंडिगो, एअर इंडिया, विस्तारा या ठिकाणी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, अशातच आता कंपनीकडून कर्मचाऱ्यांना नोटीसचा कालावधी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडू नये, असे आवाहन गो फर्स्ट कंपनीकडून करण्यात आले आहे. कंपनी अद्याप पूर्ण दिवाळखोरीत निघाली नसून ती स्वत:ला पुन्हा उभी करण्याचा प्रयत्न करत आहे, असा विश्वास गो फर्स्टच्या सीईओंकडून व्यक्त करण्यात आला आहे. कंपनीतील कर्मचाऱ्यांना या महिन्याच्या १५ तारखेपर्यंत पगार दिला जाईल, असेही सांगण्यात आले आहे.
नोटीस कालावधी पूर्ण केल्यानंतरच कर्मचाऱ्यांचा राजीनामा कंपनी स्वीकारेल
गो फर्स्टचे काही संतप्त कर्मचारी ऐकत नसल्याने त्यावर आता कंपनीने आदेश जारी केले आहेत. गो फर्स्ट एअरलाईन कंपनीने कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्यापूर्वी सहा महिन्यांचा नोटीस कालावधी (Notice Period) पूर्ण करण्यास सांगितले आहे. एका महिन्याचा नव्हे, तर तब्बल सहा महिन्यांचा नोटीस कालावधी पूर्ण करण्यास कर्मचाऱ्यांना कंपनीकडून सांगण्यात आले आहे. नोटीस कालावधी पूर्ण केल्यानंतरच कर्मचाऱ्यांचा राजीनामा कंपनी स्वीकारेल, असे कंपनीने म्हटले आहे.
दरम्यान, गो फर्स्ट एअरलाईन्सची सर्व उड्डाणे १२ मेपर्यंत रद्द करण्यात आली आहेत. कंपनीने कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्याचा पगार हा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिला. तर, आता एप्रिल महिन्यातील पगार कधी मिळेल, याची कर्मचाऱ्यांना काहीच कल्पना नाही, असे एका वरिष्ठ कर्मचाऱ्याने सांगितले.