Join us

देशाच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, परकीय चलनाच्या साठ्याने ५०० अब्ज डॉलरचं शिखर गाठलं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 12:02 AM

लॉकडाऊनमुळे सध्या भारताची अर्थव्यवस्था गंभीर संकटात सापडली आहे. मात्र, अशा संकटाच्यावेळी भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा देणारी एक बातमी आली आहे.

ठळक मुद्देभारताकडील परकीय चलनाच्या साठ्याने ५०० अब्ज डॉलरचा टप्पा पार केला आहेपाच जूनला संपलेल्या आठवड्यामध्ये भारताकडील परकीय चलनाच्या साठ्यात ८.२२ अब्ज डॉलरची भर पडलीत्यामुळे देशाकडील एकूण परकीय चलनाच्या साठा ५०१.७० अब्ज डॉलरवर पोहोचला आहे

 मुंबई - कोरोना विषाणूच्या संसर्गाचे संकट आणि त्यामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सध्या भारताचीअर्थव्यवस्था गंभीर संकटात सापडली आहे. मात्र अशा संकटाच्या वेळी भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा देणारी एक बातमी आली आहे. भारताकडील परकीय चलनाच्या साठ्याने ५०० अब्ज डॉलरचा टप्पा पार केला आहे. पाच जूनला संपलेल्या आठवड्यामध्ये भारताकडील परकीय चलनाच्या साठ्यात ८.२२ अब्ज डॉलरची भर पडली असून, त्यामुळे देशाकडील एकूण परकीय चलनाच्या साठा ५०१.७० अब्ज डॉलरवर पोहोचला आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँकेने दिली आहे. दरम्यान,  देशाच्या परकीय चलनाच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले आहे.

यापूर्वी २९ मार्च रोजी संपलेल्या आठवड्यामध्ये भारताकडील परकीय चलनाच्या साठ्यात ३.४४ अब्ज डॉलरची भर पडून तो ४९३.४८ अब्ज डॉलरवर पोहोचला होता. दरम्यान, उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी या वृ्त्ताबाबत समाधान व्यक्त केले आहे. देशाकडील वाढत्या परकीय चलनाचा वापर देशाच्या अर्थव्यवस्थेला वाढीच्या मार्गावर आणण्यासाठी केला गेला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. सुमारे ३० वर्षांपूर्वी देशाकडील परकीय चलन जवळपास संपुष्टात आले होते. तेव्हा सोने गहाण ठेवून परदेशातून आयात करावी लागली होती, अशी आठवणही महिंद्रा यांनी ताजी केली.  

दरम्यान, परकीय चलनाच्या साठ्यात झालेल्या या वाढीमुळे आता भारत परकीय चलनाच्या साठ्याच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. आता केवळ चीन आणि जपानकडे भारतापेक्षा अधिक परकीय चलनाच्या साठा आहे. तर परकीय चलनाच्या साठ्याच्याबाबतीत भारताने रशिया आणि दक्षिण कोरियाला कधीच मागे टाकले आहे.  

 तसेच परकीय चलन भंडारातील महत्त्वपूर्ण घटक असलेला घटक म्हणजे फॉरेन करन्सी अॅसेट होय. ५ जूनपर्यंत संपलेल्या आठवड्यात देशाकडील फॉरेन करंन्सी अॅसेट ८.४२ अब्ज रुपयांनी वाढून ४६३.६३ अब्ज डॉलर झाला आहे.  मात्र या आठवड्यात भारताकडील सोन्याच्या साठ्यात किंचीत घट झाली आहे. भारताकडील सोन्याच्या साठा ३२.९ कोटी डॉलरने घटून ३२.३५२ अब्ज डॉलर एवढा झाला आहे.  

टॅग्स :भारतअर्थव्यवस्थाभारतीय रिझर्व्ह बँक