Adani Group : रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या देशातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये गेल्या आठवड्यात मोठा तोटा झाला आहे. दुसरीकडे,आता गौतम अदानी यांनाही सप्टेंबरचा पहिलाच आठवडा नुकसानीचा ठरला आहे. अदानी समूहाच्या १० पैकी ५ कंपन्यांचे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या कंपन्यांमुळे अदानी समूहाच्या मूल्यांकनात ३१ हजार कोटींहून अधिक रुपयांचा फटका बसला आहे. या पाच कंपन्यांमध्ये अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट आणि अदानी टोटल गॅस यांचा समावेश आहे.
हा शुक्रवार जगातील अव्वल श्रीमंतांसाठी ब्लॅक फ्रायडे ठरला. शुक्रवारी जगातील सर्व टॉप २२ श्रीमंतांच्या संपत्तीत घसरण झाली. इलॉन मस्क यांच्या एकूण संपत्तीमध्ये १३.९ अब्ज डॉलरची सर्वात मोठी घट नोंदवली गेली. ताजी आर्थिक आकडेवारी अमेरिकेत आगामी काळात मंदीचे संकेत देत आहे. गेल्या आठवडा अमेरिकन शेअर बाजारासाठी १८ महिन्यांतील सर्वात वाईट आठवडा होता. दिग्गज भारतीय उद्योगपती गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत शुक्रवारी मोठी घसरण झाली.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या निव्वळ संपत्तीत शुक्रवारी २.१४ अब्ज डॉलरची घट झाली. यामुळे त्यांची एकूण संपत्ती १११ अब्ज डॉलरवर आली आहे. ते सध्या जगातील ११ व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्याच वेळी, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांची संपत्ती एका दिवसात १.५७ अब्ज डॉलरने घसरून ९९.६ अब्ज डॉलर झाली. ते सध्या जगातील १३ वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे.
अदानी समूहाच्या १० पैकी ५ कंपन्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर पाच कंपन्यांना फायदा देखील झाला आहे. गेल्या आठवड्यात अदानी एंटरप्रायझेसचे मार्केट कॅप ३,५८,६५३.७७ लाख कोटी रुपयांवरून ३,३९,३६१.२३ कोटी रुपयांवर घसरले आहे. यामुळे कंपनीला १९,२९२.५४ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अदानी टोटल गॅसचे मार्केट कॅप गेल्या आठवड्यात ९१,३२८.२२ लाख कोटी रुपयांवरून ९०,९७०.७९ कोटी रुपयांवर घसरले आहे. अदानी समूहाच्या पाच कंपन्यांना एकत्रितपणे ३१,१७०.५९ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
दुसरीकडे, अदानी पॉवरचे मार्केट कॅप एका आठवड्यात २,४३,७३९.२५ कोटी रुपयांवरून २,४४,९३४.९१ कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. याचा अर्थ कंपनीला १,१९५.६६ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. तर अदानी ग्रीन एनर्जीचे मार्केट कॅप एका आठवड्यात २,९१,५३३.२६ कोटी रुपयांवरून २,९५,४२२.०६ कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. गेल्या एका आठवड्यात अदानी समूहाच्या अशा पाच कंपन्यांनी ७,३१६.७७ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे.