नवी दिल्ली-
देशात १ डिसेंबरला रिटेल डिजिटल रुपयाचं यशस्वीरित्या लॉन्चिंग करण्यात आलं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) पहिल्याच दिवशी १.७१ कोटी रुपयांचा डिजिटल रुपीच्या माध्यमातून व्यवहार केला आहे. या डिजिटल रुपीची मागणी सध्या पायलट प्रोजेक्टमध्ये समाविष्ट असलेल्या फक्त चार बँकांनी निवडक शहरांसाठी केली होती. संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या काळात बँकांकडून वाढत्या मागणीचा विचार करता रिझर्व्ह बँक आणखी डीजिटल रुपी जारी करतील. पहिल्या टप्प्यात डिजिटल रुपये दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि भुवनेश्वरमध्ये लॉन्च केले गेले. या शहरांमध्ये चार बँकांच्या माध्यमातून डिजिटल करन्सी उपलब्ध करुन दिली जात आहे.
पहिल्या टप्प्यात देशातील चार शहरांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, यस बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या माध्यमातून डिजिटल रुपी उपलब्ध करुन दिली जात आहे. यानंतर बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा बँक यांनाही पायलट प्रोजेक्टमध्ये समाविष्ट केलं जाईल. दुसऱ्या टप्प्यात अहमदाबाद, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, इंदौर, कोच्ची, लखनौ, पाटणा आणि शिमला या शहरांचाही समावेश केला जाणार आहे.
कशी होईल देवण-घेवाणरिझर्व्ह बँकेकडून जारी करण्यात येणारा E-Rupee एक डिजिटल टोकनसारखं काम करेल. सीबीडीसी आरबीआयच्यावतीनं जारी करण्यात येणाऱ्या करन्सी नोटचं हे डिजिटल स्वरुप आहे. डिजिटल रुपीची देवाण-घेवाण पर्सन-टू-पर्सन (P2P) आणि पर्सन-टू-मर्चंट (P2M) अशा दोन्ही माध्यमातून करता येते. याशिवाय तुम्हाला जर मर्चंटला पेमेंट करायचं असेल तर तुम्ही समोरच्या व्यक्तीकडील QR कोड स्कॅन करुन पेमेंट करू शकता. डिजिटल रुपयाची देवाण-घेवाण बँकांच्या ई-वॉलेटच्या माध्यमातून केली जाते. देशाच्या अर्थव्यवस्थेला डिजिटल रुपात विकसित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेचं हे महत्वाचं पाऊल मानलं जात आहे.
कागदी नोटांच्या समान मूल्यडिजिटल रुपयाचं मूल्य हे कागदी नोटांच्या समान आहे. तुम्हाला हवं असल्यास डिजिटल रुपी देऊन तुम्ही कागदी नोट देखील घेऊ शकता. रिझर्व्ह बँकेनं डिजिटल करन्सीची दोन विभागात वर्गवारी केली आहे. CBDC-W आणि CBDC-R असे डिजिटल रुपीचे दोन प्रकार आहेत. CBDC-W म्हणजे होलसेल करन्सी आणि CBDC-R म्हणजे रिटेल करन्सी. याआधी रिझर्व्ह बँकेनं १ नोव्हेंबर रोजी होलसेल ट्रान्झाक्शनसाठी डिजिटल रुपया लॉन्च केला होता.