नवी दिल्ली :
गेल्या काही महिन्यांपासून जगभरात आर्थिक अनिश्चितता आणि मंदीचे सावट पसरले आहे. नफा कमी झाल्यामुळे कंपन्यांनी माेठ्याप्रमाणावर कर्मचारी कपात केली आहे. एका अहवालानुसार, ७६० कंपन्यांनी तब्बल ५.३८ लाख कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविला आहे. त्यातही सर्वाधिक कपात टेक कंपन्यांमध्ये झाली आहे.
गेल्या वर्षी साधारणत: ऑगस्ट-सप्टेंबरपासून अमेरिकेत कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात सुरू झाली. त्याची व्याप्ती वाढत गेली. अमेरिकेशिवाय भारत तसेच युराेपमधील देशांनीही हजाराे कर्मचाऱ्यांना नारळ दिला. सर्वाधिक फटका टेक कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना बसला. तर उर्जा
क्षेत्रातील कंपन्यांमधील कर्मचारी सुरक्षित राहिले.
अशी केली टेक कंपन्यांनी कपात
ॲमेझाॅन २७,१०१
मेटा २१,०००
ॲक्सेंचर १९,०००
अल्फाबेट १९,०००
मायक्राेसाॅफ्ट ११,१२०
स्विस बॅंक कपातीच्या तयारीत
स्वित्झर्लंडमधील युबीएस ही सर्वात माेठी बॅंकदेखील कर्मचारी कपात करणार असल्याची सुत्रांनी माहिती दिली. सुमारे ३६ हजार कर्मचाऱ्यांना बॅंक नारळ देउ शकते. तसे झाल्यास जागतिक पातळीवरील ही सर्वात माेठी कपात ठरेल.
बॅंकेने गेल्या महिन्यात क्रेडिट सुईस या बुडालेल्या बॅंकेचे अधिग्रहण केले हाेते.
तंत्रज्ञान क्षेत्राशिवाय रिअल इस्टेट, दूरसंचार, उर्जा इत्यादी क्षेत्रात कर्मचारी कपात झाली आहे.
२.७ लाख नाेकरी गमाविलेले कर्मचारी केवळ २४ कंपन्यांमधील आहेत.
४००० लाेकांच्या नाेकऱ्या उर्जा क्षेत्रातील कंपन्यांत ६ महिन्यांमध्ये गेल्या.
टांगती तलवार कायम
- महागाई आणि मध्यवर्ती बॅंकांनी वाढविलेले व्याजदर, हे कपातीमागील प्रमुख कारणे आहेत. महागाईमुळे खर्च वाढला. व्याजदर वाढीमुळे कंपन्यांचेही बजेट काेलमडले. कच्चा मालही महाग झाला. त्यामुळे कंपन्यांनी हात आखडता घेतला आणि पहिला फटका बसला ताे आयटी क्षेत्राला.
- काेराेना काळातील गरज पाहून आयटी क्षेत्र तसेच ऑनलाईन शिक्षण, फुड तसेच ई-काॅमर्स कंपन्यांनी माेठ्या प्रमाणात भरती केली हाेती.
- काेराेनाचा प्रभाव ओसरल्यानंतर या क्षेत्रातील अतिरिक्त मनुष्यबळ सर्वप्रथम कमी करण्यात आले.
- अमेरिकेसह काही देशांमध्ये व्याजदरात नुकतीच वाढ करण्यात आली. त्यामुळे परिस्थिती अद्यापही सुधारलेली नाही. नाेकऱ्यांवर टांगती तलवार कायम आहे.